औरंगाबाद | गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षीही कोरोना महामारीचे संकट असल्यामुळे आषाढी एकादशी घरी बसूनच साजरी करावी लागणार आहे. आषाढी एकादशी निमित्त औरंगाबाद येथील वाळूज पंढरपूर येथे दरवर्षी हजारोच्या संख्येने वारकरी येत असतात. त्याचबरोबर याठिकाणी यात्रा देखील भरवण्यात येते. परंतु यावर्षी वारकरी आणि भाविकांना घरीबसूनच वारीचा आनंद घ्यावा लागणार आहे.
यंदा यात्रा भरणार नसली तरीही पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणीला अभिषेक मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आषाढी एकादशी निमित्त विजय सक्करवार यांच्या हे विठ्ठल रुक्मिणीला चांदीचा मुकुट अर्पण करणार आहेत. अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी सांगितले. हा अभिषेक 19 जुलै रोजी रात्री 11.55 वाजता केला जाणार आहे.
औरंगाबाद शहरातील पंढरपूर हे छोटं पंढरपूर म्हणुन ओळखल्या जाते. याठिकाणी श्री विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी वारकरी पायी दिंडी घेऊन येत असतात. ताळ, मृदंग व चिपळीच्या गजरात मंत्रमुग्ध होऊन वारकरी बेधुंद होतात. परंतु यावर्षी कोरोनामुळे घरी बसूनच वारीचा आनंद घ्यावा लागणार आहे.
“कोरोना महामारीमुळे आषाढी एकादशीची वारी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘महाभिषेक आणि पूजा-अर्चना व्यतिरिक्त कुठलाही धार्मिक कार्यक्रम होणार नाही आणि दर्शनाला परवानगी मिळणार नाही”
– श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान