बॅंकांच्या संपामुळे सुमारे 450 कोटींचे व्यवहार ठप्प

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – केंद्र सरकार विरोधात 28 व 29 मार्च दरम्यान देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. या संपात देशभरातील पाच लाख बँक कर्मचारी, अधिकारी यांनी सहभाग नोंदविला आहे. संपामुळे जिल्ह्यातील सार्वजनिक बँकांचे सर्व व्यवहार ठप्प होते. दिवसभरात सुमारे 450 कोटींच्या उलाढालीवर परिणाम जाणवला. संपाच्या अनुषंगाने सोमवारी सकाळी दहा वाजता जालना रोडवरील दूध डेअरी चौकातील बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.

बँक खासगीकरण करण्यात येऊ नये, जुनी पेन्शन लागू करणे, 5 दिवसांचा आठवडा करण्यात यावा, कंत्राटी पद्धतीने नोकर भरती न करता कायमस्वरूपी नोकर भरती करावी, यासाठी हे निदर्शने करण्यात आले. सध्या मार्च एंड सुरु असल्याने बँकेशी संबंधित सर्व व्यवहार सध्या सुरु आहे. त्यातच हे दोन दिवसीय संप सुरु झाल्यामुळे सर्व प्रकारच्या क्लिअरन्सचे व्यवहार ठप्प होते. जिल्ह्यातील जवळपास दोन हजार कर्मचारी,अधिकाऱ्यांनी यात सहभाग नोंदविला. शहरासह पिसादेवी, वैजापूर, शिऊर, जालना यासह जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणचे बँक कर्मचारी या संपात सहभागी झाले होते. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन व महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्या माध्यमातून हे निदर्शने करण्यात आली.

आजही आंदोलन –
दोन दिवसीय देशव्यापी संपला पहिल्या दिवशी शहर जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला. यामुळे मंगळवारी याच संपाला पाठिंबा देण्यासाठी प्रत्येक बँकेच्या समोर सकाळच्या सत्रात निदर्शने करण्यात येणार आहे. सार्वजनिक बँकांतील कर्मचारी, अधिकारी या निदर्शनात सहभागी होत, सरकारच्या बँक खाजगीकरण, नवीन कामगार कायद्याचे धोरणाला कडाडून विरोध करणार आहेत.

Leave a Comment