औरंगाबाद : कारागृहात कैद असलेल्या गुन्हेगाराला गतवार्षिपासून बायको आणि मुले भेटायला येत नाही, फोनवर संपर्क करत नाही. यातच बायकोने दुसऱ्यासोबत लग्न केल्याचे त्याला कळल्यामुळे हर्सूल कारागृहातील एका कैद्याने अन्न त्यागले. त्याची तब्येत खालावत असल्याचे पाहून त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तो उपचार घेत नव्हता. याची गांभीर्याने दखल घेऊन कारागृह प्रशासनाने थेट त्याच्या सासुरवाडीत संपर्क करून त्याची बायको, मुले आणि सासू-सासऱ्यांना बोलावून घेत त्यांची भेट घडवून आणली.
त्यानंतर त्याने अन्नग्रहण केल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. बिडकीन पोलीस ठाण्यांतर्गत काटकर चव्हाण हा खुनाच्या गुन्ह्यात मागील साडेचार वर्षांपासून कारागृहात आहे.
त्याच्यावरील खटला सुरू आहे. कोविड संसर्गामुळे कारागृहातील कैद्यांच्या भेटीगाठी बंद केल्या आहेत. कैद्यांना नातेवाईकांशी मोबाईलवर बोलण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तरी काही कैद्यांचा नातेवाईकांशी संवाद होत नाही. यामुळे ते राग व्यक्त करतात. काटकर चव्हाण याला अटक गुन्ह्यात मागील साडेचार वर्षापासून केल्यापासून त्याची बायको मुलाबालाळासह माहेरी माळी जळगाव ( ता. राहुरी जि. अहमदनगर) येथे गेली आहे. वर्षभरापासून काटकर आणि त्याची पत्नी आणि मुलांची भेट झांली नाही त्याला जामीनही मिळाला नाही.
शिवाय पत्नीने दुसरे लग्न केल्याचे त्याला सांगण्यात आले. पत्नीने दूसरा विवाह केला असेल तर आपल्या मुलांचे काय झाले, ते कसे आहेत आणि कुणासोबत राहत आहेत, त्यांच्यासोबत तरी बोलणे करून द्या असे तो म्हणत होता. मात्र मुलांसोबत त्याचे बोलणे झाले नाही. यामुळे एकाकीपणातून त्याने ३ जूनपासून जेवण घेणे बंद केले. ही बाब काही दिवसांनी प्रशासनाला समजली, तेव्हा त्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने जेवण केले नाही. त्याची प्रकृती खालावत असल्याचे पाहून कारागृह प्रशासनाने त्याला १८ जून रोजी घाटी रुग्णालयात दाखल केले. तो उपचार घेण्यास नकार देत सलाईन काढून फेकत होता.