पुणे | प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले विद्यापीठात शिकणाऱ्या व कमवा आणि शिका योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला कमवा आणि शिका योजनेत घेतलं गेलं पाहिजे या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आज आंदोलन केले. विद्यापीठात शिकणारे अनेक विद्यार्थी ग्रामीण व दुर्गम भागातून येत असतात.अशावेळी कमवा आणि शिका योजनेतील संख्या मर्यादित ठेवली तर गरीब विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी काम बघावे लागते. स्वावलंबनाची शिकवण देणाऱ्या कर्मवीर अण्णांच्या कमवा आणि शिका योजनेत विद्यार्थी विद्यापीठातच काम करुन पैसे मिळवू शकतात. त्यामुळे मागेल त्याला काम या कारणासाठी हे आंदोलन केले गेले आहे. यासोबतच विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला जयकर ग्रंथालयात प्रवेश मिळाला पाहिजे ही मागणीही आंदोलकांनी यावेळी उचलून धरली. यावेळी विकास खंडागळे, प्रताप हरकळ, रंगा हनुमंत, अजय चौधरी व इतर सहकारी उपस्थित होते. विद्यापीठ आवारातच हे आंदोलन सुरु असून दौऱ्यावर असलेले कुलगुरु नितीन करमाळकर याबाबतीत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.