एसीबीची कारवाई : बिलाच्या 3 टक्केप्रमाणे लाच घेताना वीज वितरणचा अभियंता रंगेहाथ सापडला

ACB
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फलटण | वीज कंपनीत केलेल्या कामाचे 13 लाख रुपयांचे बिल पुढील कार्यालयात मंजुरीला पाठवण्यासाठी 39 हजारांची लाच घेताना फलटणच्या वीज वितरण कार्यालयातील कार्यकारी अभियंता मंदार प्रकाश वग्याणी (वय 41, सध्या रा. फलटण, मूळ रा. वर्धमान, सोना क्लीनिक जवळ, आप्पासाहेब पाटीलनगर, आमराईच्या मागे, सांगली) याला सातारा लाचलुचपतच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. बिलाच्या 3 टक्केप्रमाणे लाचेची मागणी करण्यात आली होती.

याबाबत अधिक माहिती अशी, याप्रकरणी 39 वर्षीय तक्रारदाराने एसीबीमध्ये तक्रार दिली आहे. तक्रारदार यांनी फलटण वीज वितरण कंपनीमध्ये 13 लाखांचे काम केले होते. या कामाचे बिल मंजुरीला पुढच्या कार्यालयात पाठवण्यासाठी कार्यकारी अभियंता मंदार वग्याणी याला ते भेटले. मात्र, वग्याणी याने तक्रारदार यांच्याकडे त्यासाठी 3 टक्क्यांप्रमाणे 39 हजार रुपयांची लाच मागितली. लाचेची मागणी झाल्याने तक्रारदार यांनी एसीबी विभागात जाऊन तक्रार दिली.

त्यानुसार लाचलुचपतचे पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के यांनी तपासाला सुरुवात केली असता वग्याणी हा लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. लाचेची रक्कम मंगळवारी घेण्याचे ठरल्यानंतर एसीबी विभागाने सापळा लावला. मंगळवारी दुपारी फलटणमधील वीज वितरणच्या कार्यालयातच वग्याणी याने 39 हजारांची लाच घेतली. यावेळी एसीबी विभागाने त्याला रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.