औरंगाबाद – वैजापूर तालुक्यातील लासुर रोडवर मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास वऱ्हाडाच्या ट्रकला भीषण अपघात झाला. यात 4 चार तर 22 जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील शिवराई फाट्यावर भीषण अपघात झाला. दोन आयशर ट्रकमध्ये हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी वाहनांचा वेग जास्त असल्यामुळे गतीवर अचानक नियंत्रण मिळवणे अशक्य झाले आणि चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. या मुळे दोन्ही ट्रक परस्परांवर धडकले. यापैकी एक ट्रक लग्न समारंभावरून परतत होता. त्यामुळे त्यात अनेक प्रवासी होते, अशी माहिती मिळतेय. याच ट्रकमधील 4 जण ठार झाले असून यात दोन लहान मुलांचा समावेश आहे.
दरम्यान, शिवराई फाट्यावर झालेल्या या भीषण अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये घडलेला प्रकार कळवण्यात आला. परिसरातील नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी चौघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अपघातातील उर्वरीत जखमींवर आता पुढील उपचार सुरु आहे.