Accident News| पुणे शहरात वाहतुकीसंदर्भातील नियमांचे उल्लंघन आणि चालकांच्या बेफिकरीपणामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, याच कारणामुळे पुण्यात रविवारी रात्री एकाच वेळी सलग तीन अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या अपघातांत दोन जणांचा मृत्यू झाला असून, तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हे अपघात काळेपडळ, फुरसुंगी आणि हडपसर परिसरात घडले आहेत. परंतु या घटनांमुळे पुन्हा एकदा पुणे शहरातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पुण्यात पहिला अपघात पुणे-सासवड रस्त्यावर उरळी देवाची येथे घडला. येथे चारचाकी वाहन पाठीमागे घेत असताना एका वृद्ध महिलेस जोरदार धडक बसली. या अपघातात सिंधुबाई क्षीरसागर (वय 85) या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी वाहनचालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी वाहनचालक मनोज अहिरे याला ताब्यात घेतले आहे. तसेच, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर दुसरा अपघात (Accident News) काळेपडळ परिसरात घडला. येथे एका अज्ञात चारचाकी वाहनाने फूड डिलिव्हरी करणाऱ्या तरुणाला जोरदार धडक दिली. या धडकेत मझहर जिलानी शेख (वय 34) याचा जागीच मृत्यू झाला आहे. मात्र अपघातानंतर वाहनचालक फरार झाला. त्यामुळे पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे ऑनलाइन डिलिव्हरी करणाऱ्या तरुणांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे.
पुढे पुण्यातील तिसरा अपघात हडपसर येथील जेएसपीएम कॉलेजसमोर झाला. या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. अद्याप अपघाताची नेमकी कारणे स्पष्ट झाली नसली तरी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पुणे शहरातील एकाच दिवशी झालेल्या या तीनही अपघातांमुळे वाहतूक व्यवस्थेवर गंभीर टीका केली जात आहे. तसेच, हे अपघात रोखण्यासाठी सरकारकडून उपाययोजना राबवण्यात याव्या अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान,पुणे शहरात सातत्याने वाढत असलेल्या अपघातांमुळे (Accident News) वाहतूक सुरक्षेचा मुद्दा गंभीर झाला आहे. वेगमर्यादा, वाहतूक नियमांचे पालन न करणे आणि निष्काळजीपणा यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळेच प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वारंवार नागरिकांकडून केली जात आहे. मात्र याबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलताना प्रशासन दिसत नाही.