पुणे- बंगळूर महामार्गावर अपघात : सीटबेल्ट नसल्याने आठ वर्षाचा मुलीचा मृत्यू तर पती- पत्नी जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | भरधाव वेगाने निघालेली चारचाकी पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर शेंद्रे येथे पलटी झाल्याने आठ वर्षांची बालिका जागीच ठार झाल्याची घटना घडली. अनया सुनील चौगुले (वय- ८, रा. कसबा सांगवा, ता. कागल, जि. कोल्हापूर) असे मृत बालिकेचे नाव आहे. दरम्यान या अपघातात गाडीतील पती- पत्नीने सीटबेल्ट लावला असल्याने ते जखमी झाले, तर मुलगी अनया हिला सीटबेल्ट नसल्याने अपघातात मृत्यू झाला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, सुनील चौगुले हे पत्नी आणि मुलीसमवेत चारचाकीने पुणे येथे नातेवाइकांकडे गेले होते. सोमवारी सकाळी ते पुण्याहून कोल्हापूरकडे निघाले होते. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ते भरधाव वेगाने शेंद्रे येथे आले असताना समोर असणाऱ्या पिकअप टेम्पोला ओव्हरटेक करत असताना त्यांची चारचाकी पलटी झाली आणि थेट नाल्यात जावून पडली. यात पाठीमागे बसलेल्या अनयाचा डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

सुनील चौगुले आणि त्यांच्या पत्नीने सीटबेल्ट लावला असल्यामुळे दोघेही बचावले. ते दोघेही जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच सातारा शहर पोलीस ठाण्यातील हवालदार संजू गुसिंगे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघाताची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

Leave a Comment