पुणे- बंगलोर महामार्गावर MBAच्या दोन बहिणींना चारचाकीने उडविले : एकीचा मृत्यू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पुणे- बंगलोर महामार्गावर वाठार गावच्या हद्दीत काॅलेजवरून घरी निघालेल्या दुचाकीवरील दोन बहिणांना एका चारचाकी गाडीने जोरदार धडक दिली. यामध्ये दोघींना कराड येथील कृष्णा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, यामधील एका बहीणीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. याबाबतची फिर्याद किशोरी धोंडीराम लोहार (वय- 22, रा. गोवारे, ता. कराड) हिने दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवारी दि. 24 मे फिर्यादी किशोरी लोहार व चुलत बहीण कल्याणी संजय लोहार हीच्या सोबत अॅक्टीव्हा गाडी नंबर (MH- 09- BN- 0163) कृष्णा फाऊंडेशन येथील काॅलेज गेल्या होत्या. यावेळी कल्याणी लोहार ही गाडी चालवित होती तर किशोरी पाठीमागे बसलेली होती. दुपारी 01.15 वा. चे सुमारास महामार्गावर रस्ता क्राॅस करताना कराडच्या बाजूने येणाऱ्या एका चारचाकी क्रेटा गाडीने (MH- 12- PN- 1668) अॅक्टीव्हा गाडीला जोराची धडक दिली. या धडकेत कल्याणी लोहार ही चारचाकी गाडी सोबत फरपटत पुढे थोडे अंतरावर गेली. तर किशोरी गाडीवरून पडल्याने तिला दुखापत झालेली होती.

अपघाताच्या घटनास्थळावरील लोकांच्या मदतीने दोन्ही बहीणींना उपचारासाठी कृष्णा हाॅस्पीटल कराड येथे दाखल करण्यात आले होते. यामधील कल्याणी लोहार हिचा बुधवारी दि. 25 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी चारचाकी गाडीचा चालक रियाज बालेचाँद आत्तार (रा. लोणंद ता. खंडाळा जि. सातारा) याचे विरोधात फिर्यादीने तक्रार दिली आहे.