चालक- वाहकाची मानसिकता नसताना कामावर पाठविल्याने झाला ‘तो’ अपघात

औरंगाबाद – लातूर-अंबाजोगाई मार्गावर रविवारी सकाळी अपघात झालेल्या लातूर- औरंगाबाद एस.टी.वरील चालक-वाहकांची मानसिकता नसताना त्यांना जबरदस्तीने कामावर पाठविण्यात आले. त्यातूनच अपघात झाला, असा आरोप संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी केला. मात्र, एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी हा आरोप फेटाळत, दोन्ही कर्मचारी अनेक दिवसांपासून कर्तव्यावर होते, असे स्पष्ट केले.

सिडको बसस्थानकातून शनिवारी दुपारी तीन वाजता चालक सुभाष गायकवाड आणि वाहक चंद्रशेखर पाटील हे लातूरला बस घेऊन रवाना झाले होते. लातूरहून परत येताना अपघात होईल, असे त्यांना स्वप्नातही वाटले नसावे. या अपघातात वाहक चंद्रशेखर पाटील यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच एस.टी. कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. पाटील यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. या घटनेनंतर नातेवाइकांनी अपघातस्थळी धाव घेतली.

या दोन्ही कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने कामावर पाठवण्यात आले. त्यांची कर्तव्यावर जाण्याची मानसिकता नव्हती, असा आरोप संपकरी कर्मचाऱ्यांनी केला; परंतु चालक सुभाष गायकवाड हे 12 डिसेंबरपासून कर्तव्यावर होते, तर वाहक चंद्रशेखर पाटील हे २७ नोव्हेंबरपासून कामावर होते. त्यांना जबरदस्तीने कामावर पाठविले नव्हते. लातूर मार्गावर त्यांना कर्तव्य देण्यात आले होते आणि ते गेले, असे सिडको बसस्थानकाचे आगार व्यवस्थापक लक्ष्मण लोखंडे यांनी स्पष्ट केले.