हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आचार्य चाणक्य यांनी आपल्या शास्त्रांमध्ये जिवनातील प्रत्येक पैलूचे तपशीलवार वर्णन केले आहे. आपल्या शास्त्रांत त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याचा वापर करून कोणत्याही अडचणीतून बाहेर पडता येईल. आचार्य चाणक्य यांची नीति आणि विचार थोडे अवघड वाटले तरी तेच जीवनाचे अंतिम सत्य आहे. सध्याच्या धावपळीच्या जिवनात ही नीति मदत करेल. आचार्य चाणक्य आपल्या नीतिशास्त्रात म्हणतात की, यशाबरोबरच शत्रूही माणसाकडे येतात. यशस्वी व्यक्तीने नेहमी आपल्या शत्रूंपासून सावध असले पाहिजे.
चाणक्यांच्या मते, कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात दोन प्रकारचे शत्रू असतात, एक जो दिसतो आणि दुसरा जो दिसत नाही.चाणक्यांच्या मते, जे दिसत नाहीत ते शत्रू जास्त धोकादायक असतात. ते आधी लपून व्यक्तीचा कमकुवतपणा ओळखतात आणि नंतर योग्यवेळी पाठीमागून हल्ला करतात. त्यामुळे अशा शत्रूंपासून नेहमी दूर राहावे. आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रात शत्रूपासून दूर राहण्याचे अनेक मार्ग सांगितले आहेत. चाणक्य नीतिमध्ये सांगितले गेले आहे की, जर एखादी व्यक्ती ‘या’ 4 गोष्टींची काळजी घेत असेल तर त्याचा शत्रू कधीही त्याच्या मागून हल्ला करू शकणार नाही. चला तर मग चाणक्य नीतिमध्ये सांगितल्या गेलेल्या ‘या’ 4 गोष्टींबाबत जाणून घ्या…
१. सावध रहा –
चाणक्य नीतिशास्त्र सांगते की, तुमचे शत्रू नेहमीच तुमच्यावर लक्ष ठेवून असतात हे लक्षात असू द्यात. तो सतत तुमच्या उणिवा शोधत असतो. त्यामुळे नेहमीच सावध रहा आणि असे कोणतेही काम करू नका, ज्यामुळे तुमच्या शत्रूला तुमच्यावर विजय मिळवण्याची संधी मिळेल.
२. योजना तयार ठेवा –
आचार्य चाणक्य यांच्या मते आपल्या शत्रूला कधीही कमी समजू नये. त्यांचा सामना करण्यासाठी आधीच योजना तयार ठेवा. हे लक्षात असू द्यात कि तुमच्या योजनांबाबत सर्वांशी चर्चा करत बसू नका. आपल्या योजनांबाबतच्या चर्चा या नेहमी जबाबदार आणि विश्वासू व्यक्तींबरोबरच केल्या पाहिजेत. जर तुम्ही आपल्या योजनेबाबत योग्य सावधगिरी बाळगली नाही तर शत्रू तुमच्या या सवयीचा फायदा घेऊन तुमच्या कामात अडथळा आणू शकतील.
३. वाईटापासून दूर रहा –
आचार्य चाणक्य म्हणतात की, वाईटापासून दूर राहिले पाहिजे. जर तुम्हाला मोठे यश मिळवायचे असेल आणि शत्रूचा पराभव करायचा असेल तर कधीच कोणाचे वाईट करू नका आणि कोणाचे वाईट ऐकू नका. वाईट करणे आणि ऐकणे हे देखील नुकसान करते आणि शत्रूला बळ देते. त्यामुळे ही सवय सर्वांत आधी सोडली पाहिजे.
४. मर्यादांचा आदर करा –
चाणक्य नीति सांगते की मानवी जीवनातील प्रत्येक नात्याला एक प्रकारची मर्यादा असते. ही मर्यादा कधीही ओलांडू नये. या सवयीचा फायदा शत्रूही घेतो. शत्रू नेहमीच तुमच्यावर नाराज असलेल्या लोकांना त्याच्याशी जोडण्यास तयार असतो. त्यामुळे प्रत्येक नात्यांमध्ये नेहमीच शिस्त पाळली पाहिजे.