तुला व तुझ्या भावाला गुन्ह्यात मदत करतो, बाहेर काढतो 20 हजार रुपये दे…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात लाच मागण्यांमध्ये आता पोलिसही असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान एकीकडे चक्क गृहमंत्री दौऱ्यावर असताना दुसरीकडे पोलिसाकडून एका गुन्ह्यातील दोघा आरोपींना त्यातून बाहेर काढण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी संबंधित पोलीस हवालदारास एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या प्रकारामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

सातारा जिल्ह्यातील लोणंद पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात दोघांना मदत करण्यासाठी व गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी पोलिस हवालदार भगवान किसन पवार (वय 51, मूळ रा.कोळकी,ता. फलटण) याने लाच स्वीकारल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसाला न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, लोणंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका युवकाचे गावातील यात्रेवेळी भांडणे झाली. याप्रकरणी लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाली. या प्रकरणाचा तपास लोणंद पोलीस ठाण्याचे पोलिस हवालदार भगवान पवार करत होते. यावेळी एसीबी प्रकरणातील तक्रारदार हवालदार पवार याला भेटल्यानंतर त्यांनी ‘तुला व तुझ्या भावाला गुन्ह्यात मदत करतो. तसेच पुढे गुन्ह्यातून बाहेर काढतो. त्यासाठी 20 हजार रुपये दे,’ असे सांगत लाच मागितली.

पोलिसांकडून लाचेची मागणी झाल्याने संबंधित तक्रारदार युवकाने सातारा एसीबी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांना सर्व घडलेल्या प्रकारची व लाच मागणाऱ्या पोलिसांबद्दल माहिती दिली. त्यानंतर उपअधीक्षक अशोक शिर्के यांनी तक्रार दाखल करुन पोलीस निरीक्षक विक्रम पवार यांना या प्रकरणी तपासाच्या सूचना दिल्या.

एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तीन दिवसांपूर्वी संबंधित तक्रारदार युवकाडून तक्रार दाखल करुन घेतल्यानंतर पडताळणी केली. त्यावेळी अधिकाऱ्यांना दि. 7 मे रोजी 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर संबंधित एसीबी पथकातील अधिकाऱ्यांनी एक ट्रॅप लावला. सोमवारी सापळा रचत संबंधित अधिकाऱ्याला सायंकाळी पैसे घेताना रंगेहाथ पकडले.

पोलिसाला फुटला घाम

लाच मागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याबद्दल एसीबी अधिकाऱ्यांनी ट्रॅप लागल्याचे पोलिसाच्या लक्षात आल्यानंतर पोलीसाला घामच फुटला. यानंतर अधिकाऱ्यांनी संबंधित पोलिसाला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. तसेच मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Leave a Comment