हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची देशाच्या उपराष्ट्रपतिपदी निवड झाल्यानंतर त्यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा दिला. यानंतर महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण होतील याची प्रतीक्षा अनेकांना लागली होती. अखेर महाराष्ट्राच्या नवीन राज्यपालांचे नाव समोर आलं आहे. आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल असतील. विशेष बाब म्हणजे आचार्य देववृत्त हे सध्या गुजरातचे सुद्धा राज्यपाल आहेत. आता त्यांच्यावर महाराष्ट्राची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रूपती मुर्मू यांनी हि नियुक्ती केली आहे.
याबाबत राष्ट्रपती कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, भारताच्या राष्ट्रपतींनी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारी पार पाडण्यासाठी नियुक्ती केली आहे, जी ते त्यांच्या विद्यमान जबाबदाऱ्यांव्यतिरिक्त पार पाडतील.
कोण आहेत आचार्य देवव्रत ?
हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील समलखा तालुक्यात जन्मलेले आचार्य देवव्रत हे एक शिक्षणतज्ज्ञ आणि राजकारणी आहेत. ते २०१९ पासून गुजरातचे २० वे राज्यपाल म्हणून काम करत आहेत. याआधी ते २०१५ ते २०१९ पर्यंत हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते. आता त्यांच्याकडे गुजरात सह महाराष्ट्राचा देखील पदभार सोपवण्यात आला आहे.
दरम्यान, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे राज्यपाल आणि एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा दणदणीत पराभव केला. या निवडणुकीत एकूण 768 खासदारांनी मतदान केले होते. यामध्ये सीपी राधाकृष्णन यांना एकूण 452 पहिल्या पसंतीची मतं मिळाली आहेत. तर दुसरीकडे सुदर्शन रेड्डी यांना एकूण 300 पहिल्या पसंतीची मतं मिळाली. त्यामुळे सीपी राधाकृष्णन यांच्या रूपाने भारताला नवे उपराष्ट्रपती मिळाले आहेत. सीपी राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती झाल्यानंतर आता त्यांच्या जागी गुजरातचे राज्यपाल आचार्य देववृत्त यांची नियुक्ती महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी करण्यात आली आहे.




