औरंगाबाद : देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयास नॅक पुनमूल्यांकनात ‘अ’ दर्जा प्राप्त झाला असल्याची माहिती संस्थेचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेच्या (नॅक) समितीने ५ व ६ ऑगस्टदरम्यान भेट देत पाहणी केली होती. या पाहणीनंतर नॅकने नुकताच निकाल जाहीर केला. यामध्ये देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयास ४ पैकी ३.१ गुण मिळाले.
महाविद्यालयात शिकवले जाणारे अभ्यासक्रम, अध्यापन, मूल्यमापन, रिसर्च कन्सल्टन्सी, मूलभुत सुविधा, विद्यार्थ्यांचे समर्थन व प्रगती, प्रशासकीय नेतृत्व व्यवस्थापन, नाविण्यपूर्ण उपक्रम आदींची पाहणी करून नॅक समितीने हा दर्जा बहाल केला असून नॅक पुनमूल्यांकनात मराठवाडा विभागात ‘अ’ दर्जा करणारे हे एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय ठरले असल्याचे आ. सतीश चव्हाण यांनी सांगितले. देवगिरी अभियांत्रिकी व व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय विविध अभिनव व उपक्रमशील प्रयोगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नेहमीच गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देत आले आहे. जागतिकीकरणाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना व्यावसायाभिमूख विविध अभ्यासक्रम महाविद्यालयात शिकवले जातात. शैक्षणिक क्षेत्रातील आधुनिक अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम महाविद्यालयातील शिक्षक करत आहेत. एलसीडी प्रोजेक्टर, प्रोजेक्ट, कार्यशाळा आदी माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे धडे देण्यात येतात. अभ्यासक्रम व शिकवण्याची पध्दत यावर विद्यार्थ्यांकडून ‘फीड बैंक’ घेतला जातो. मागील दीड-दोन वर्षांपासून कोविडमुळे महाविद्यालय बंद असल्याने ऑनलाईन वर्ग घेतले जात आहे. यासाठी महाविद्यालयाच्यावतीने ई-लर्निंग ग्रुप, मायक्रोसॉफ्ट टीम्स तसेच विविध ऑनलाईन प्लॅटफर्म विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध करून दिले असल्याचे देखील आ. सतीश चव्हाण यांनी सांगितले.
महाविद्यालयाच्यावतीने संशोधन पध्दतीवर नेहमीच भर दिला जातो. यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. शिक्षक, विद्यार्थी यांच्यामध्ये संशोधन वृत्ती वाढावी हा या मागचा उद्देश आहे. महाविद्यालयाच्या नावे दोन डी.एस.टी. प्रोजेक्टस् आहेत. महाविद्यालयाच्यावतीने सर्व मूलभूत सुविधा विद्यार्थ्यांना देण्यात येतात. भव्य क्रीडांगण, दर्जेदार वसतिगृह, ई-ग्रंथालय, सुसज्ज संगणक लॅब आदी सुविधा महाविद्यालयात आहेत. विशेषत: नॅक समितीने महाविद्यालयाच्यावतीने देण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधांची प्रशंसा केली. संस्थेच्या दूरदृष्टी नेतृत्वाचा व कुशल व्यवस्थापनाचा तसेच महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी सर्वांचे हे यश असल्याचे आ. सतीश चव्हाण म्हणाले.