कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
प्लास्टिक बंदी असतानाही प्लास्टिक वापरणाऱ्या दुकानदारांवर मलकापूर नगर पालिकेची दंडात्मक कारवाई करण्यात आली. मलकापूर शहरातील दुकानांची पालिकेच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली. यावेळी पथकाने पाच दुकानांवर केली दंडात्मक कारवाई केलेली आहे.
पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्लास्टिक वापरास बंदी घालण्यात आली आहे. पालिकेने याबाबत वारंवारं व्यावसायिकांना याबाबतची माहिती देवून कमी मायक्रॉनच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरणाऱ्यावर बंदी असल्याचे सांगितले होते. परंतु तरीही पालिकेच्या हद्दीतील व्यावसायिक प्लास्टिक वापरत असल्याचे निदर्शनास येत होते. त्यामुळे पालिकेने स्वतंत्र पथक तयार करून शहरातील दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केलेली आहे.
याबाबत मलकापूर मधील दुकानांमध्ये कमी मायक्रॉनच्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत आहे अशी माहिती मलकापूर नगरपालिकेला मिळाली होती. त्यानुसार मलकापूर नगरपंचायतीचे रमेश बागल, अंकुश गावडे, सुनील शिंदे, सुभाष बागल, प्रसाद बुधा, अमृत येडगे, पंकज बागल, वैभव अरणे यांनी मलकापूर परिसरातील दुकानांची तपासणी केली. यामध्ये कमी मायक्रॉनच्या प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या पाच दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मलकापूर मधील दुकानदारांनी कमी मायक्रोनच्या प्लास्टिक पिशव्या वापरू नये तसेच प्लास्टिक बंदीला सहकार्य करावे असे आवाहन मलकापूर नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.