सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
सातारा भरारी पथकाने कर्नाटकवरून मुंबईला जाणाऱ्या बेकायदा कर्नाटक बनावटीच्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये तब्बल 13 लाख 11 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कराड शहराच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर नाका येथे सदरची कारवाई करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूर विभाग कोल्हापूरचे डॉक्टर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली व सातारा राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक वैभव वैद्य यांच्या नेतृत्वाखाली सातारा भरारी पथकाने दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली आहे. याप्रकरणी गौरव चंद्रकांत खरात (राहणार मालोशी) व सतीश जगन्नाथ ढेबे (राहणार भांडवली) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून टाटा कंपनीचा टेम्पो, दोन मोबाईल, दारूच्या बाटल्या लपवण्यासाठी प्लास्टिकच्या गोणी व कर्नाटक बनावटीच्या दारूच्या बाटल्या असा एकूण 13 लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
याप्रकरणी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सदरच्या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक एस यू शिंदे, दुय्यम निरीक्षक एन पी क्षीरसागर, जवान ए व्ही खरात, महिला जवान रानी काळोखे यांनी सहभाग घेतला. पुढील तपास दुय्यम निरीक्षक एन पी क्षीरसागर करीत आहेत.