व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

फलटणला विनापरवाना गाैण खनिज प्रकरणी कारवाई

फलटण | आळंदी- पंढरपूर पालखी महामार्गाच्या सुरु असलेल्या कामात आर. के. चव्हाण इन्फा प्रा. ली. पुणे कडून शासनाचा कोट्यावधीचा महसुल बडवून परवाग्या न घेता गौणखनिज वाहतुक करणाऱ्या 15 ब्रास माती व मुरूम वाहणार्‍या 4 हायवा गाड्यांवर महसुल विभागाने कार्यवाही केली आहे.

या बाबत महसुल विभागाकडुन मिळालेल्या माहीतीनुसार व सामाजिक कार्यकर्ते अमोल मोरे यांच्या तक्रारीवरुन महसूल विभागाने फलटण- आसू रोड आसू पाटी धुळदेव जवळ विनापरवाना अनधिकृरीत्या माती व मुरूम वाहणारे 15 ते 20 हायवा गाड्या जात होत्या. त्यातील 4 गाड्या महसुल विभागाने पकडल्या असून गाडी चालकाकडे गौण खजिन वाहतूक परवानाबाबत विचारणा केली. तेव्हा परवाना आढळून न आल्याने संबधीत 4 गाड्या धुळदेव तलाठी अभिजीत मोरे, धुळदेव पोलीस पाटील पवन आडके यांनी ताब्यात घेवून तहसिल कार्यालय फलटण येथे तहसील आवारात आणून जमा केल्या. सदर चार गाड्यांचा पंचनामा केला असता 5 ब्रास माती व 10 ब्रास मुरुम त्यामध्ये आढळून आला. तसेच विना परवाना मुरूम वाहतुक करणाऱ्या 3 हायवा गाड्या तलाठी मोरे व सामाजिक कार्यकर्ते यांचे समोरून पळून गेल्या. सदर गाड्या या आर. के. चव्हाण इन्फा प्रा. ली. पुणे यांच्या असल्याचे निष्पन्न झाले आहे.

गेल्या अनेक महिन्यापासून फलटण तालुक्यातील पालखी महामार्गाचे काम सुरू आहे. या कामाकडे महसूल अधिकारी, लघुपाटबंधारे विभाग तसेच हायवे प्राधिकरण यांचे सर्वांचे दुर्लक्ष आहे. विशेष करून अनधिकृत गौणखणीजचा उपसा व विक्री याकडे महसूल विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. या दुर्लक्षित पणामुळेच संबंधित ठेकेदाराचे फावले आहे. दिवसासह रात्रीपण अनधिकृत बेकायदेशीर कामाचा सपाटा सुरु आहे. आज पकडलेल्या विनापरवाना गाड्यावरून आर. के. चव्हाण इन्फ्राने शासनाला किती रूपयांचा महसुल बुडविला असेल यांचा शोध घेणे गरजेचे आहे. फलटण तालुक्यातील ज्या गावातुन मुरूम व मातीचा उपशा होत आहे. तेथील शेत जमीनीची त्रयस्थ विभागांकडून चौकशी करण्याची आवश्यकता आहे. उपसा करण्यात आलेल्या शेत जमीनीचा पंचनामा व मोजमाप करण्याची गरज आता महसूल विभाग करणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. सदरच्या विनापरवाना चालू असलेल्या गौण खनिज करणाऱ्या ठेकेदारावर महसूल विभाग कारवाई करणार की सोडणार याकडे फलटण तालुक्यातील सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.

मुरुम व मातीचा नियमबाह्यपणे उपसा सुरु
फलटण तालुक्यातील कुरवली बुद्रुक, बरड, सस्तेवाडी, नाईकबोमवाडी, भवानीनगर, राजुरी, विडणी, तरडगाव, काळज, धुळदेव, वडले, मिरढे व इतर गावात महसूल विभागाची कोणत्याही प्रकारची परवानी नाही. तरी अनेक महिन्यांपासून लाखो रूपयांचा मुरूम व मातीचा उपसा सुरू आहे. दिवसरात्र हजारो हायवाच्या माध्यमातून केंद्राचे पालखी महामार्गाचे काम आहे, असा दम देऊन काही परिपत्रके व आदेश दाखवून कोटींचा चुना राज्य शासनाला लावला असल्याचे दिसत आहे.