अतिक्रमण हटाव : लोणंदला पालखी सोहळा स्वागतास 300 हून अधिक टपऱ्या, शेड जमीनदोस्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सलग दुसर्‍या दिवशी अतिक्रमण हटाव मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेत वाहतूकीला अडथळा ठरणारी तब्बल 300 च्या वर अतिक्रमण केलेल्या टपर्‍या, शेड जमीनदोस्त करण्यात आली. यामुळे पालखी मार्गासोबत लोणंद शहरातील चौक आणि मुख्य रस्त्यांनीही मोकळा श्वास घेतला आहे.

सकाळी 7 वाजता लोणंदच्या पालखी तळाच्या बाजूची अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात करण्यात आली होती. यानंतर परतीचा पालखी मार्ग असणार्‍या लोणंद – खंडाळा व लोणंद – सातारा रोडच्या कडेने नवी पेठ, गांधी चौक, शास्त्री चौकातील दुतर्फा असणारी पायर्‍या, शेड, ओटे, टपर्‍या हटवण्यात आल्या. अतिक्रमण हटाव मोहिमेची तीव्रता पाहून अनेक व्यापारी व नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमणे हटवली.

लोणंद – शिरवळ रोडच्या कडेने दुतर्फा असणारी अतिक्रमणे जेसीबीने जमीनदोस्त केली. स्टँडसमोरील जागेतील अतिक्रमणेही टपरीधारकांनी स्वत:हून काढली. अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे संपूर्ण लोणंद शहरातील रस्ते, पालखी तळ, शासकीय जागा मोकळ्या झाल्या. रात्री उशीरा पर्यत अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येत होती. तहसिलदार दशरथ काळे हे या मोहिमेचे हिरो ठरले. दोन दिवस स्वत: फिल्डवर उभे राहून अतिक्रमणे हटवण्यात त्यांनी अधिकार्‍यांना सूचना केल्या. त्यांना मुख्याधिकारी संजय गायकवाड व सपोनि विशाल वायकर यांनी चांगली साथ दिली.