कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
शहरात अनेक लोक बाजारपेठेत विनामास्क काढून फिरत असतात. लोकांना कोरोनाचे गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. त्यामुळे शासनाने दिलेल्या निर्देशानुसार गणेश उत्सव साजरा करावा लागणार आहे. आपल्या भागात अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे, त्याठिकाणी गणेश मंडळांनी पुढाकार घेऊन मदत करावी. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणारच, कुणीही उल्लंघन करू नये. भावनेच्या आहारी जाऊन कोणतेही पाऊल तरूणांनी उचलू नये, असे आवाहन पोलिस उपअधीक्षक डाॅ. रणजित पाटील यांनी केले आहे.
कराड शहरातील गणेश मंडळांची आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, मुख्याधिकारी रमाकांत डाके, जेष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, सौरभ पाटील, आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, फारूक पटवेगार, जयवंत बेडेकर, मनसे नेते दादासो शिंगण, पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील, अमित बाबर, राहूल वरोटे, पतंगराव पाटील, गोपनीय विभागाचे प्रशांत पाटील, रविंद्र देशमुख यांच्यासह कराड शहरातील गणेश मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील म्हणाले, कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने 2 कोटीहून अधिक रक्कमेचा दंड वसूल करण्यात आला आहे. सर्वांच्यावर कायदा, सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, ते नियम पाळावेच लागतील. अनेक सण, उत्सव यामधून कोरोनाचा उद्रेक झाला आहे. तेव्हा आपण काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे कोरोना नियमांची गरज आहे. कुणाच्या जीवनापेक्षा भावना महत्त्वाच्या नाहीत.
नगरसेवक साैरभ पाटील म्हणाले, आमच्या भारत माता गणेश मंडळास 50 वर्ष पूर्ण होत असून सुवर्ण महोत्सव आहे. मात्र कोरोना काळात सर्व कार्यकर्त्यांनी आणि आमच्या मंडळाने साध्या पध्दतीने गणेश उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हा शहरातील सर्व मंडळांनी कोरोनाचे नियम पाळून उत्सव साजरा करावा.
कराड शहराने गणेशोत्सव साजरा करावा : विजय वाटेगांवकर
माणसांने निसर्गांची हानी केल्याने आज त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. शहरातील अनेक गणेश मंडळातील तरूण कार्यकर्ते तसेच सभासद हे कोरोना काळात गमावले गेले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या या महामारीने अनेक जवळचे प्रिय व्यक्ती आपणांस सोडून गेले आहेत. ज्याच्या घरातील व्यक्ती कोरोनामुळे मृत्यू पावली त्यांनी विचारा गणेशोत्सव कसा साजरा करावा. त्यामुळे भावना बरोबर आहे, मात्र आपल्या लोकांच्या जीवापेक्षा काहीही महत्वाचे नाही. त्यामुळे कराड शहरातील गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन आरोग्य सभापती विजय वाटेगांवकर यांनी केले आहे.