कराड | तांबवे ग्रामपंचायतीच्या वर्धापन दिनानिमित्त राबवलेले विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम कौतुकास्पद आहेत. गावच्या उन्नतीसाठी व पुढील वाटचालीत भूतकाळ माहित असणे गरजेचे असते. सामाजिक क्षेत्रातील कार्याचा गाैरव होत असून त्यांना काम करण्यास अजूनही प्रेरणा या सन्मानामुळे मिळेल अशी अपेक्षा सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीमती रेखा दुधभाते यांनी व्यक्त केली.
तांबवे (ता. कराड) येथील ग्रामपंचायतीच्या 81 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध शालेय स्पर्धांचे बक्षीस वितरण, सुकन्या-समृद्धी योजनेतील मुलींना पोस्टाच्या खाते पुस्तकांचे वाटप, कोरोना व पुरकाळात योगदान व सहकार्य करणाऱ्या व्यापारी, औषध विक्रते, अंगणवाडी सेविका-मदतनीस, महिला बचतगट, आशा स्वयंसेवीका, डाॅक्टर, विविध संस्था यांच्या सन्मानावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शोभाताई शिंदे होत्या.
कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्या विजयताई पाटील, सह्याद्री कारखान्याचे संचालक रामचंद्र पाटील, कोयना बॅंकचे संचालक अविनाश पाटील, ग्रामपंचायत सदस्य देवानंद राऊत, उत्तम साठे, धनंजय ताटे, आबासो गुरव, बाळासाहेब शिंदे (सर), सतिश पाटील, उद्योजक अशोकराव पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुरेश पाटील, सचिव सुनिल पाटील, रघुनाथ पाटील (गुरुजी), उत्तम राऊत, ग्रामविकास अधिकारी टि. एल. चव्हाण यांचेसह विद्यार्थी पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक उपसरपंच ॲड. विजयसिंह पाटील यांनी केले. सुत्रसंचालन सतिश यादव यांनी केले. आभार सरपंच शोभाताई शिंदे यांनी मानले.