औरंगाबाद प्रतिनिधी । मागील दोन वर्षांपासून संत एकनाथ रंगमंदिराच्या नूतनीकरणाचे काम रखडले आहे. याच पार्श्वभूमीवर नाट्यगृहाची प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी आज सकाळी पाहणी केली. तब्बल दोन वर्षांनंतरही काम रखडल्याचे पाहून दामले यांनी नाराजी व्यक्त केली. नोव्हेंबर २०१७ मध्ये दामले यांनी औरंगाबाद शहरातील नाट्य कलावंत आणि रसिकांसह नाट्यगृहात झाडलोट केली होती. रंगमंचावरील पडदे शिवून प्रतिकात्मक निषेध देखील नोंदवला होता. या आंदोलनानंतर महापालिका प्रशासनावर प्रचंड टीका झाली होती. महापौर, पालकमंत्री यांनी तातडीने निधी जाहीर करुन नाट्यगृहाचे नूतनीकरण सुरू केले.
मात्र, वर्षभरातच निधी नसल्याने नाट्यगृहाचे काम रखडले. या प्रकारावर दामले यांनी टीका केली. ”दोन वर्षांपूर्वी नाट्यगृहाची स्थिती जशी होती, त्यापेक्षा अधिक वाईट स्थिती आज आहे. दोन वर्षांत काहीही झाले नाही. मनपाने आर्थिक तरतूद न करता नाट्यगृह बंद का केले” असा प्रश्न दामले यांनी उपस्थित केला. दरम्यान ”नाट्यगृहाचे काम किती दिवसात पूर्ण होईल ते जाहीर करण्यात आले नाही. नाटक हा राजकारण्यांसाठी शेवटचा विषय आहे. तरी प्रशासनात आणि राजकारणात नाटकाबद्दल आस्था असलेले लोक आहेत. त्यांनी जोर लावून काम करुन घेणे अपेक्षित आहे” असे दामले म्हणाले आहेत. तसेच महापालिकेच्या कामकाजावर देखील अभिनेते प्रशांत दामले यांनी खंत व्यक्त केली आहे.