औरंगाबाद | काही दिवसापूर्वीच मेल्ट्रॉन रुग्णालयामध्ये एका ऑक्सिजन प्लांटचे नुकतेच लोकार्पण झाले होते. आता येथील दुसऱ्या ऑक्सीजन प्लांटची उभारणी सुरू असतानाच आता तिसर्या प्लांटला मंजुरी मिळाली आहे. दिवसाला 175 जंबो सिलेंडर क्षमतेच्या या प्लांट मधून इतर कोविड सेंटरला ऑक्सीजन पुरवण्याची सुविधा होणार असून उभारणीसाठी साहित्य ही आल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.
चिकलठाण्यातील मनपाच्या मेल्ट्रॉन कोविड सेंटरमधील 345 बेडला ऑक्सिजनची सुविधा करण्यात आली आहे. त्याकरिता दोन ऑक्सीजन प्लांट उभारणीचे नियोजन होते. यापैकी सीएसआर निधीतून उभारणी करण्यात आलेल्या पहिल्या ऑक्सीजन प्लांटमुळे दररोज 40 जम्बो सिलेंडर ऑक्सिजन मिळणार आहे.
स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्ट रोजी ऑक्सीजन प्लांटचे लोकार्पण करण्यात आले. दरम्यान पालिकेच्या विनंतीवरून शासनाने मेल्ट्रोनसाठी एक ऑक्सीजन प्लांट मंजूर केला आहे. हा ऑक्सीजन प्लांट एअररॉक्स टेक्नॉलॉजी प्रा. या कंपनीकडून उभारला जाणार असून एक दिवसात 175 जम्बो सिलिंडर ऑक्सिजन यातून मिळणार आहे. यासाठी 2 कोटी 79 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ऑक्सीजन प्लांट उभारण्यासाठी लागणारे साहित्य मेल्ट्रॉन येथे आणण्यात आले आहे अशीही माहिती डॉक्टर पाडळकर यांनी दिली.