औरंगाबाद : खाम नदी पुनरुज्जीवन विकास प्रकल्पाच्या कामाला गती आली असून महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी या मोहिमेत सहभागी स्वयंसेवी संस्था, संघटना व दोनशे नागरिकांना, युवक-युवतींना सोबत घेऊन कोरोना नियमाचे पालन करत आज खाम नदीवर पाच टन प्लास्टिक उचलून वृक्षारोपण केले.
खाम नदी पुनरुज्जीवन विकास प्रकल्पाचे काम माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत गेल्या सहा महिन्यापासून दर शनिवारी महानगरपालिका, स्मार्ट सिटी, सी आय आय, छावणी परिषद, व्हॅरॅक, ईको सत्व, स्वयंसेवी संस्था, संघटनांच्या अनुभवी व्यक्तींना, नागरिकांनासोबत घेऊन लोकसहभागातून काम केले जात आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी आज खामनदीला भेट देऊन पाहणी केली आणि विशेष म्हणजे स्वतःहून या कामात सहभाग घेत प्लास्टिक उचलले.
यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता ए. बी. देशमुख, मोहिनी गायकवाड, जिल्हा उत्खनन अधिकारी डॉ. अतुल दोड, इकोसत्त्वाच्या नताशा झरीन, स्मार्ट सिटीचे गौरी मिराशी, आदित्य तिवारी आणि सिद्धार्थ जाधव, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक असदुल्ला खान यांच्याकडून साप्ताहिक स्वच्छता, वृक्षारोपण, आढावा घेतला. या पुढील विकास कामाबाबत चर्चा करून करण्यात येणाऱ्या विविध कामांचे नियोजन केले.