औरंगाबाद – शहरातील प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी औरंगाबाद महापालिकेने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्याचे ठरवले आहे. यापुढे महानगर पालिकेतील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांसाठी डिझेल किंवा पेट्रोलचे नवीन वाहन खरेदी केले जाणार नाही. त्याऐवजी फक्त इलेक्ट्रिक वाहनेच खरेदी केली जातील. पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीपैकी 80 टक्के रक्कम प्रदूषण कमी करण्यावर खर्च करावा, असे शासनाने कळवले आहे. या धोरणाची माहिती नुकतीच औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली.
महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले की, प्रदूषण कमी करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याचे धोरण आखले आहे. येत्या काळात इलेकेट्रिक वाहने रस्त्यांवर मोठ्या संख्येने उतरणार आहेत. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने स्मार्ट सिटी अभियानातील अधिकाऱ्यांसाठी 5 इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापाठोपाठ महापालिकेतसुद्धा यापुढे इलेक्ट्रिक वाहनेच खरेदी केली जातील. महापालिका प्रशासकांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद महापालिकेला पंधराव्या वित्त आयोगाचा 63 कोटी 51 लाख रुपये निधी मिळाला आहे. या निधीतून विविध कामे करण्याचे नियोजन केलेले होते. मात्र शासनाने, वित्त आयोगाचा 80 टक्के निधी शहरांचे प्रदूषण कमी करण्याच्या कामांवर खर्च करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार राज्य शासनाची परवानगी घेऊन महापालिकेतर्फे आगामी काळात इलेक्ट्रिक वाहने खरेदी जातील, असे प्रशासक पांडेय यांनी सांगितले.
सिटीबसमध्येही इलेक्ट्रिक बस वाढवणार
औरंगाबाद शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पातून बससेवा सुसरु करण्यात आली आहे. सिटी बसच्या ताफ्यात सध्या 100 बस आहेत. यात आणखी पाच इलेक्ट्रिक बसची वाढ होणार आहे. मुंबईतील बेस्टने इलेक्ट्रिक बस खरेदी केल्या आहेत. यातील पाच बस मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. मात्र ते अपयशी ठरले. म्हणून आता स्मार्ट सिटी अभियानातून पाच बस खरेदी केल्या जातील, या बस पर्यटन मार्गावर धावतील, असे प्रशासक पांडेय यांनी सांगितले.