कौतुकास्पद! स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कराड नगरपालिका यंदाही देशात पहिली

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कराड पालिकेने दुसऱ्यांदा बाजी मारत यंदाही देशात पहिला क्रमांक पटकावला. एक लाख लोकसंख्येच्या पालिका गटात कऱ्हाड शहर अव्वल ठरले. आज (गुरुवार) पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे त्याची अधिकृत घोषणा झाली. ही घाेषणा हाेताच कऱ्हाड पालिकेत उत्साहाचे वातावरण हाेते.

गत वर्षी याच स्पर्धेत कऱ्हाड पालिकेने एक लाख लोकसंख्येच्या आतील शहरांमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवला होता. यंदाही स्पर्धेत कऱ्हाड देशात अव्वल क्रमांकावर ठरेल, असेच काम पालिकेच्या माध्यमातून झाले हाेते.

नागरिकांनी पालिकेच्या स्वच्छता विषयक उपक्रमांना भरघोस पाठिंबा दिला. त्यामुळे पालिका स्वच्छ सर्वेक्षणात अग्रेसर राहिली आहे. पालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे परिश्रम त्यामागे आहेत. नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका व गट नेते, स्वच्छता दूत, 105 सामाजिक संस्था, त्यांचे प्रतिनिधी, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, शाळा, महाविद्यालये, विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षकांचेही सहकार्य लाभले आहे. या यशात तत्कालीन मुख्याधिकारी यशवंत डांगेंचा सिंहाचा वाटा आहे.

शहरात कचरा संकलन, विलगीकरण व त्यावर प्रक्रिया करण्यात नगरपालिका 100 टक्के यशस्वी झाली आहे. त्यामुळे पालिकेस कचरामुक्त शहराचे थ्री स्टार मानांकन आहे. कृष्णा नदीचे सौंदर्यीकरण, भूमिगत गटारे, सांडपाण्यावर प्रक्रिया, शेतीसाठी त्याचा पुनर्वापर, सार्वजनिक शौचालये, ओल्या कचऱ्यावरील प्रक्रिया, बारा डबरे येथे स्वच्छता उद्यान अशा विविध पातळ्यांवर पालिकेने यश मिळवले आहे.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.