हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे (Advay Hire) यांना न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. रेणुका सूतगिरणी प्रकरणातील फसवणुकीच्या आरोपाखाली अद्वय हिरे यांना बुधवारी रात्री मध्यप्रदेशातील भोपाळमधून अटक झाली होती. रेणुका सूतगिरणीसाठी अद्वय हिरे यांनी साडेसात कोटी कर्ज घेतले होते. हे कर्ज न फेडल्यामुळे त्यांच्यावर 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. आता त्यांना याप्रकरणी कोर्टाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
काय आहे प्रकरण ?
रेणुका सूतगिरणीकडून साडेसात कोटी कर्ज घेतले होते. ते न फेडल्याने 30 कोटींच्यावर रक्कम गेली होती. त्यामुळे अद्वय हिरे यांच्यावर 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र अद्वय हिरे यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टाने जामीन नाकारताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. अद्वय हिरे हे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसेंचे कट्टर विरोधक मानले जातात. शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी काही दिवसांतच ठाकरे गटात प्रवेश केला होता.
जुन्या प्रकरणाला नवा राजकीय रंग –
जिल्हा बँकेची रेणुकादेवी यंत्रमाग औद्योगिक संस्थेवर 32 कोटींची थकबाकी आहे. कर्ज घेताना बँकेची दिशाभूल करुन कर्ज घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणात मालेगाव तालुक्यात असलेल्या रमझानपुरा पोलिसांत 29 जणांविरोधात फसणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यंत्रमाग प्रकल्पासाठी बोगस दस्तऐवज दाखवून कर्ज घेतल्याचा आरोप आहे. हे प्रकरण आठ वर्ष जुने आहेत. याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरु होती.
अद्वय हिरेंचा राजकीय प्रवास –
अद्वय हिरे यांनी काही महिन्यांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यापूर्वी ते भाजपमध्ये होते. शिवसेनेतून शिंदे गट वेगळा झाल्यानंतर दादा भुसे शिंदे गटासोबत राहिले. यामुळे उद्धव ठाकरे यांनी अद्वय हिरे यांना ठाकरे गटात घेऊन दादा भुसे यांना पर्याय देण्याचा प्रयत्न केला. ते दादा भुसे यांचे कट्टर विरोधक आहेत. ते शिवसेनेचे उपनेते आहेत. त्यांनी नाशिक जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.
हिरे यांची अटक राजकीय – खा. संजय राऊत
अद्वय हिरे यांची अटक राजकीय असल्याचा दावा खा. संजय राऊत यांनी केला आहे. त्यांच्यावरील आरोप ते भाजपमध्ये असतानाही होते. दादा भूसे यांच्यावरही गिरणा सहकारी साखर कारखान्यात घोटाळा केला आहे. आम्ही रितसर त्यासंदर्भात तक्रार केली आहे. हसन मुश्रीफ यांनी संताजी घोरपडे साखर कारखान्यात घोटाळा केला आहे. परंतु अद्वय हिरे यांनी मालेगावमध्ये विधानसभा लढवू नये, यासाठी त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. आता २०२४ ला पोलिसांचा हिशेब केला जाईल, असे खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे.