अहमदनगर । गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्याची मागणी जोर धरु लागली असतानाच आता अहमदनगरचे नाव बदलण्याचा मुद्दा शिवसेनेनं उपस्थित केला आहे. शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी अहमदनगरचे नामांतर अंबिकानगर करण्याची मागणी केली आहे. शिर्डी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार लोखंडे यांनी ही मागणी केली.
‘औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर व्हावे, ही जनतेची इच्छा आहे. त्यासंबंधी आमचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील. मात्र, औरंगाबादपाठोपाठ अहमदनगरचेही नामांतर होऊन या शहराला अंबिकानगर नाव देण्यात यावे अशी आमची मागणी आहे.’ असे सांगत लोखंडे यांनी या जुन्या मागणीला हवा भरली आहे.सध्या औरंगाबादच्या नामांतराच्या जुन्याच मागणीला नव्याने फोडणी देण्यात येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जाहीरपणे या मागणीला विरोधही दर्शविला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची कोंडी होत असून भाजपच्या नेत्यांनी या प्रश्नात हवा भरण्यास सुरवात केली आहे.
औरंगाबादमध्ये हे सुरू असतानाच शिर्डीचे शिवसेनेचे खासदार लोखंडे यांनी अहमदनगरच्या नामांतराची जुनीच मागणी पुढे आणली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेसह हिंदुत्ववादी संघटनांकडून अहमदनगरच्या नामांतराची मागणी सुरू आहे. अर्थात त्यावरून काहींमध्ये मतभेद आहे. काहींनी अंबिकानगर तर काहींनी आनंदनगर नाव सूचविले आहे. अंबिकानगर नाव देण्याची मागणी जुनी आहे. यावरून अनेकदा आंदोलनेही झाली आहे. नगरला पूर्वी भरलेल्या ७० व्या साहित्य संमेलनातही हा मुद्दा उपस्थित झाला आहे.औरंगाबादच्या नामांतराची विषय निघाला की अहमदगरचाही पुढे येतो. यावेळी हा पुढे आणण्यात शिवसेनेच्या शिर्डीच्या खासदाराने आघाडी घेतली आहे.
नगरच्या महापालिकेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने भाजपची सत्ता आहे. तर शिवसेना विरोधात आहे. शहराचे आमदार राष्ट्रवादीचे आहेत, खासदार भाजपचे आहेत. अशा वेगळ्या राजकीय समीकरणाचे राजकारण असल्याने नामांतराविषयी महानगरपालिकेची भूमिका काय, असेल हेही उत्सुकतेचे आहे. तर दुसरीकडे सरकार आणि सरकारमधील घटक पक्षांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. औरंगाबादच्या नामांतरास विरोध असल्याचे सांगणारे महसूलमंत्री थोरात हेही नगरचे आहेत. त्यामुळे नामांतरासंबंधी त्यांची आणि काँग्रेसची भूमिकाही महत्वाची आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’