Wednesday, October 5, 2022

Buy now

वहिणीसोबत केलेल्या कृत्याचा घेतला बदला ! दिराने गावातील तरुणाला ‘या’ पद्धतीने संपवले

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिक जिल्ह्याच्या कळवण याठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. आपल्या वहिनीला वारंवार फोन करत असल्याच्या कारणातून दिरानेच ही हत्या केली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या सहा तासात हत्येचं गूढ उलगडलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दिराला राहत्या घरातून अटक केली आहे. या आरोपी दिराविरोधात कळवण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा कसून तपास सुरु आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
पंकज मधुकर वाघ असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो कळवण तालुक्यातील बिजोरे येथील रहिवासी होता. मृत पंकज हा बिजोरे गावातील रहिवासी असणारा रविंद्र नामदेव निकम याच्या वहिनीला नेहमी फोन करायचा. त्यामुळे आरोपी रविंद्र निकम याचा पंकजवर राग होता. याच कारणातून आरोपी रविंद्र निकम यानं धारदार शस्त्राने वार करून पंकजची हत्या केली.

घटनेच्या दिवशी काय घडले ?
घटनेच्या दिवशी मृत पंकज वाघ हा रात्री साडेअकराच्या सुमारास शेतातील मजूर रविंद्र सोनवणे यांना आणण्यासाठी गेले होता. पण तो बराच वेळ घरी न आल्यामुळे पंकज यांच्या आईने आपल्या नातवाला फोन करण्यास सांगितलं. चारवेळा फोन करूनही पंकजकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पंकजचे आई- वडील आणि मुलगा त्यांना शोधण्यासाठी शेताच्या दिशेनं गेले. यावेळी चंदननळी ते बिजोरे या रस्त्यावर पंकज रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा त्याअगोदरच मृत्यू झाला होता.

यानंतर पोलिसांनी शेतातील शेतमजूर रविंद्र सोनवणे याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. आरोपी रविंद्र निकम हा ‘माझ्या भावजयीला नेहमी फोन का करतो’ असा जाब विचारण्यासाठी पंकजकडे आला असता दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि यातूनच संतापलेल्या रविंद्र याने पंकजवर धारदार शस्त्राने वार करून त्याची निर्घृणपणे हत्या केली. या प्रकरणी कळवण पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.