कोलकात्यातही इंग्लंडहून आलेले २ विमान प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह; ‘कोरोना स्ट्रेन’ने भारताची चिंता वाढवली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोलकाता । दिल्लीनंतर कोलकात्यातही इंग्लंडहून (London Flight Passengers) आलेले दोन विमान प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह. रविवारी प्रवासी आल्याची एअरपोर्ट अधिकाऱ्यांची माहिती. विशेष म्हणजे आज सकाळीच इंग्लंडहून दिल्लीत आलेले 5 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह सापडलेत. इंग्लंडमध्ये कोरोनाचा घातक अवतार ‘कोरोना स्ट्रेन’ (New Coronavirus Strain) समोर आलाय आणि तिथून आलेले प्रवासीच कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानं चिंतेची स्थिती आहे. ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसची नवी प्रजाती (New Coronavirus Strain) ‘कोरोना स्ट्रेन’ आढळून आल्याने जगातील सर्व देशांसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. भारतात कोरोनाची परिस्थिती निवळत असताना पुन्हा एकदा नवं संकट देशासमोर उभं ठाकलं आहे. (Positive For COVID-19)

ब्रिटनमधून भारतात येणाऱ्या सर्व विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत रद्द
ब्रिटनमध्ये कोरोनाचा कहर वाढल्याने ब्रिटनहून भारतात येणाऱ्या सर्व विमानसेवा तूर्तास बंद ठेवण्यात आल्या आहेत. येत्या 31 डिसेंबरपर्यंत ही विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यूरोपीयन देशांनीही या आधीच ब्रिटनमधून येणाऱ्या विमानसेवेला बंदी घातली होती. भारत सरकारने ब्रिटनमधून येणारी विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत बंद केल्या आहेत. काल रात्री 12 वाजल्यापासून ही सेवा बंद होणार आहे.

महाराष्ट्रात खबरदारी, नाईट कर्फ्यू लागू
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (21 डिसेंबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली. राज्यात आज 22 डिसेंबर 2020 पासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही संचारबंदी 5 जानेवारीपर्यंत लागू राहील. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील 15 दिवस अधिक सतर्क रहावे लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

कोरोना स्ट्रेन म्हणजे काय?
कोरोना स्ट्रेन हे कोरोनानं घेतलेलं नवं रुप मानलं जात आहे. सप्टेंबर महिन्यात ब्रिटनमध्ये कोरोनाचं हे रुप पाहायला मिळालं होतं. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात ब्रिटनमध्ये कोरोनाचे जितके रुग्ण सापडले, त्यांच्या एक तृतीशांश लोकांमध्ये हा नवा कोरोना सापडला. तर डिसेंबर महिन्यात याचं प्रमाण झपाट्यानं वाढलं आणि सापडणाऱ्या 3 पैकी 2 रुग्णांमध्ये नवा विषाणू सापडू लागला. यावरुनच हा संसर्गाच्या बाबतीत अतिशय घातक असल्याचं समोर आलं. आधीच्या कोरोनापेक्षा 70 टक्के अधिक क्षमतेनं हा लोकांना संक्रमित करतो आहे. नॉर्दन आयर्लंड सोडलं तर सगळ्या ब्रिटनमध्ये या कोरोना स्ट्रेनचा फैलाव झाल्याचं पाहायला मिळतंय.

नव्या कोरोना स्ट्रेनमुळे धोका वाढला?
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोना स्ट्रेनमुळे 3 गोष्टीत धोका वाढला आहे. पहिली गोष्ट म्हणजे हा विषाणू अतिशय जलदगतीनं दुसऱ्या विषाणूचं रुप घेतो आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, कोरोना विषाणूच्या त्या भागात बदल होत आहेत, जे भाग संक्रमण पसरवण्यात अतिशय महत्त्वाचे मानले जातात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे, कोरोना विषाणूच्या काही म्युटेशनमध्ये मानवांना संक्रमित करण्याची क्षमता वाढलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळेच हा नवा कोरोना विषाणू आधीपेक्षा शक्तीशाली आणि जलद गतीनं पसरणारा असल्याचं सांगितलं जातंय.

म्युटेट होणं म्हणजे काय?
म्युटेट होणं म्हणजे विषाणूच्या जेनेटिक मटेरिअलमध्ये होणारे सततचे बदल. कोरोना विषाणूत शास्त्रज्ञांना हजारो म्युटेशन सापडले आहेत. हे म्युटेशन वायरसच्या स्पाईक म्हणजेच त्याच्या काट्याच्या आकारातील रचनेत हा लपलेले असतात. हेच स्पाईक मानवी कोशिकांवर चिटकतात, आणि त्यातून हा विषाणू आपला प्रसार करतो.

कोरोना विषाणूने याआधीही रुपं बदलली आहेत?
याआधीही कोरोनाच्या विषाणूनं अनेक रुपं बदलली आहेत. आधी चीनच्या वुहानमध्ये सापडलेला कोरोना विषाणू हा आता जगभरात सापडणाऱ्या कोरोना विषाणूहून भिन्न आहे. D614G प्रकारातला विषाणू फेब्रुवारी महिन्यात युरोपात सापडला होता. आता जगभरात याच प्रकारचा कोरोना विषाणूच सर्वात जास्त सापडतो. A222V हा एक प्रकारचा कोरोना विषाणू आहे, जो युरोपातच सापडला, हा त्या लोकांमध्ये सर्वाधिक सापडला, जे स्पेनमध्ये उन्हाळ्याची सुट्टीची मजा घेण्यासाठी गेले होते.

आता प्रश्न येतो ब्रिटनमध्ये हा प्रकार आला कुठून?
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार कोरोना स्ट्रेन हा कोरोनाचा बदललेला प्रकार अशा रुग्णांच्या शरीरात बदलला, ज्याची प्रतिकारशक्ती अतिशय कमी होती. ज्यामुळे हा विषाणू जिवंत राहिला. रुग्णाची प्रतिकारशक्ती त्याला संपवू शकली नाही. आणि त्यानं तिथंच रुप बदललं आणि पुन्हा संक्रमणाला सुरुवात केली. (Everything to know about New coronavirus strain in UK)

या कोरोना स्ट्रेनमुळे परिस्थिती अधिक धोकादायक होईल?
सध्यातरी याचं कुठलंही प्रमाण नाही, मात्र यावर बारीक लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. याचं संक्रमणाचं प्रमाणं अधिक असल्यानं पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची लाट येईल. रुग्णालयं पुन्हा अपुरी पडू लागतील. आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. आणि अशा परिस्थितीत अनेकांना उपचाराअभावी प्राण गमवावे लागण्याची भीती वर्तवली जात आहे.

कोरोनाच्या या नवीन प्रकारावर लस प्रभावी ठरणार?
ही गोष्ट आता निश्चित आहे की कोरोना लसीचा प्रभाव या कोरोना विषाणूवर नक्की होणार. ब्रिटनमध्ये सध्या ज्या 3 लसी दिल्या जात आहेत, या लसींमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे जरी कोरोनानं रुप बदललं तरी ती नव्या कोरोना विषाणूवर हल्ला करते, आणि त्याला संपवते. भारतातही सीरमची लस या विषाणूला संपवण्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जात आहे.

पण यामध्ये एक धोका आहे…
जर या विषाणूला म्युटेट होऊ दिलं, तर चिंता वाढू शकते. कारण, सध्या हा विषाणू लसीपासून वाचण्याच्या परिस्थितीत पोहचत आहे. लसीपासून वाचण्यासाठी विषाणू आपलं रुप बदलतो. त्यामुळे लस ही विषाणूवर प्रभावी ठरत नाही. आणि विषाणू आपलं संक्रमणाचं काम सुरु ठेवतो. त्यामुळेच आताचा कोरोनाचा स्ट्रेन अतिशय चिंतेची गोष्ट मानली जात आहे. जर कोरोनाने असे म्युटेन बनवले, की ज्यामुळे लस त्यावर प्रभावी ठरणार नाही. तर परिस्थिती गंभीर होईल, आणि त्यानंतर जगभरात फ्ल्यूसारखी परिस्थिती तयार होईल अशी भीती शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र, सध्या एक चांगली गोष्ट ही की, सध्या ज्या लसी आहेत, त्यामध्ये कोरोनानं बदललेल्या रुपानुसार तातडीनं बदल करणं शक्य आहे. त्यामुळे विषाणूचा खात्मा करणं सोपं होईल असं लस निर्माते सांगत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment