धक्कादायक ! आजीनं केलेला अपमान जिव्हारी लागल्याने तरुणीची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गडहिंग्लज : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूरातील गडहिंग्लज याठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आजी रागावल्याचा राग मनात धरून एका 19 वर्षीय तरुणीनं आत्महत्या केली आहे. मृत तरुणीनं रविवारी विष पिऊन आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. काही वेळात तिला अस्वस्थ वाटत असल्याचं कुटुंबीयांना कळताच तिला उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तरुणीनं आज अखेरचा श्वास घेतला.

पूजा सुरेश भुसुरी असं आत्महत्या करणाऱ्या तरुणीचं नाव असून ती गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव या ठिकाणची रहिवाशी होती. मृत पूजाचं दहावी पर्यंतचं शिक्षण झालं होतं. रविवारी सकाळी ती नेहमीपेक्षा उशीरापर्यंत झोपली होती. खूप उशीरापर्यंत झोपल्यानं आजी तिच्यावर रागावली होती. यानंतर आजीनं केलेला अपमान जिव्हारी लागल्यानं तरुणीनं विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विष प्यायल्यानंतर पूजाला अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे नातेवाईकांनी तिला त्याच दिवशी कोल्हापूरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.

दुसऱ्या दिवशी सोमवारी तिला गडहिंग्लज येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. याठिकाणी उपचार सुरू असताना, मंगळवारी 10 ऑगस्ट रोजी पूजानं अखेरचा श्वास घेतला. केवळ उशीरापर्यंत झोपल्यामुळे रागावल्याच्या कारणातून तरुणीनं जीव दिल्यानं गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नसून या घटनेचा तपास सुरू केला आहे.

Leave a Comment