कोल्हापूर नंतर उस्मानाबाद जिल्ह्याने मला खूप प्रेम दिले – खासदार संभाजीराजे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उस्मानाबाद | कोल्हापूरनंतर उस्मानाबाद जिल्ह्याने मला जीवापाड प्रेम दिले आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्याचाही खासदार समजून खासदार ओमराजे यांच्यासोबत जिल्ह्यातील रखडलेल्या प्रश्नांवर काम करू,अशी नि:संदिग्ध ग्वाही खासदार तथा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजी महाराज यांनी दिली. उस्मानाबाद शहरातील एमएच २५ या फूड मॉलच्या उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी बोलताना खासदार छत्रपती संभाजी महाराज पुढे म्हणाले,उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक विकासाची कामे होत असतानाच नवनवीन व्यवसाय रुजू पाहत आहेत. ही चांगली बाब आहे. तुळजापूरचे मटण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. आपल्या भागात असलेल्या बाबींचे योग्य प्रकारे मार्केटिंग करून त्याचे व्यवसायात रूपांतर करण्याची गरज आहे. उस्मानाबाद शहरात चांगल्या दर्जाची हॉटेल्स सुरु होत असल्याने खवय्यांची सोय होत आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याचे अनेक प्रश्न खासदार म्हणून ओमराजे सभागृहात मांडत आहेत.त्यांनी शाश्वत पाण्यासाठी, उद्योगासाठी तसेच रेल्वेच्या प्रश्नासाठी आवाज उठवला आहे. त्यांची तळमळ मी नेहमी पाहतो. दिल्लीत ते हातात फायली घेऊन धावपळ करताना दिसतात. येणाऱ्या काळात उस्मानाबाद जिल्ह्याच्या प्रश्नासाठी त्यांना मी स्वतःनिश्चितपणे प्रयत्न करेन.

दरम्यान यावेळी खासदार ओमराजे यांनी जिल्ह्याच्या रखडलेल्या विकासाच्या प्रश्नावर भाष्य केले. ते म्हणाले, लातूर हा उस्मानाबाद जिल्ह्यातील एक तालुका होता,१९८३ मध्ये स्वतंत्र जिल्हा होऊन,त्या जिल्ह्याचा चौफेर विकास झाला. उस्मानाबाद जिल्ह्याचा रखडलेला विकास पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करीत असून,छत्रपती संभाजी महाराज यांचेही सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.उस्मानाबाद शहरात कोविड काळात डॉ.लाकाळ व डॉ.कदम यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांनी कौतुक केले.

नगराध्यक्ष मकरंद राजे यांनी अध्यक्षीय समारोपात शहरात नवनवीन व्यवसाय सुरू होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, डॉ.तानाजी लाकाळ, डॉ.रणजित कदम,उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख,स्वप्निल सोकांडे,गणेश आवाड आदी उपस्थित होते. तसेच शहरातील व्यवसायिक, अधिकारी, शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment