‘निवडणुकांवर डोळा ठेवून राजकीय पक्षांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा’; मोदी सरकारनंतर अण्णांचा विरोधकांवर निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर । शेतकऱ्यांच्या बाबतीत मोदी सरकारवर खोटारडेपणाचा आरोप करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता देशातील विरोधी पक्षांवरही निशाणा साधला आहे. (Anna Hazare Criticises Opposition Parties) ”दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राजकीय फायदा समोर ठेवून विरोधक रस्त्यावर आले आहेत. निवडणुकांवर डोळा ठेवून केली जाणारी विविध राजकीय पक्षांची ही आंदोलने चुकीची आहेत,” अशा शब्दांत अण्णा हजारे यांनी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या राजकीय पक्षांवर निशाणा साधला आहे.

कालचं मोदी सरकारवर टीका केल्यानंतर आज हजारे यांनी विरोधी पक्षांवर टीका केली. ते म्हणाले, ”शेतकरी आंदोलनात (Farmers Protest) आता राजकीय पक्ष सहभागी झाले आहेत. निवडणुकांचे राजकारण लक्षात घेऊन त्यांनी हा पाठिंबा दिला आहे, हे चुकीचे आहे. आंदोलनात आपला पाठिंबा केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नांना आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात अगर कोणत्या पक्षाच्या पाठिंब्यासाठी हे आंदोलन नाही. हे प्रश्न घेऊन आपण पूर्वीही आंदोलने केली आहेत. कृषीमूल्य आयोगाला स्वायत्तता देणे आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे या आपल्या मुख्य मागण्या आहेत. त्या पूर्ण झाल्या तर शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे” अण्णा म्हणाले.

”मात्र, सरकार याबद्दल काहीही निर्णय घ्यायला तयार नाही. यासाठी पूर्वी आपण आंदोलने केली, तेव्हा सरकारचा खोटारडेपणा दिसून आला. आताही शेतकऱ्यांचे दिल्लीतील हे आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकार चर्चा आणि बैठकांचा फार्स करीत आहे. यातून आंदोलनाची हवा कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. माझ्या आंदोलनाच्या वेळीही सरकार असेच करीत होते. लोकपालच्या वेळी आपण मागे हटलो नाहीत, त्यामुळे कायदा झाला. आता शेतकऱ्यांनी मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटू नये,” असेही हजारे म्हणाले.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी हजारे यांनी आज राळेगणसिद्धीत लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. पदमावती मंदिराच्या परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सकाळी 10 वाजल्यापासून हजारे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्यासवेत ग्रामस्थ आणि कार्यकर्तेही आहेत. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदच्या हाकेला प्रतिसाद देत आज राळेगणसिद्धीत बंद पाळण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment