हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नवी मुंबईनंतर आता मराठवाड्यात ही बर्ड फ्लूचा (Bird Flu) प्रादुर्भाव दिसून येत आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील किवळा गावातही बर्ड फ्लूच्या संसर्गाची पुष्टी झाली आहे. गावातील एका कुक्कुटपालन केंद्रात पक्ष्यांच्या मृत्यूची नोंद झाल्यानंतर नमुने तपासणीसाठी पुणे आणि भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर संपूर्ण परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गावात अलर्ट झोन घोषित (Bird Flu)
बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने तातडीने पावले उचलली आहेत. किवळा गावातील १० किलोमीटर परिसरात ‘अलर्ट झोन’ घोषित करण्यात आला आहे. यासह परिसरातील 565 कोंबड्यांना ताब्यात घेऊन सुरक्षित विल्हेवाट लावण्यात आली आहे. तसेच, कुक्कुटपालन केंद्रे, चिकन विक्रीची दुकाने, अंडी आणि पोल्ट्री उत्पादने विक्रीला बंदी घालण्यात आली आहे.
बर्ड फ्लूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना खबरदारीचा सल्ला दिला आहे. चिकन आणि अंडी खाणे टाळावे तसेच स्वच्छतेच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. याचबरोबर, भीतीचे वातावरण टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. सोशल मीडियावर अफवा पसरणार नाही, याचीही दक्षता घेतली जात आहे.
कसा पसरतो बर्ड फ्लू?(Bird Flu)
बर्ड फ्लू हा विषाणूजन्य संसर्ग असून तो पक्ष्यांपासून मानवांमध्येही संक्रमित होऊ शकतो. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक आहेत. अशावेळी, संक्रमित पक्ष्यांच्या संपर्कात येणे टाळावे, परिसर स्वच्छ ठेवावा आणि संशयित लक्षणे आढळल्यास त्वरित प्रशासनाशी संपर्क साधावा, असे मार्गदर्शन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
दरम्यान, किवळा गावात बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतकरी आणि पोल्ट्री व्यवसायिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.