आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई
कोतवालीचे सहायक पोलीस उपनिरीक्षक रामसिंह गुलाबसिंह चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मंगळवारी पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांची भेट घेतली. सुसाईड नोटमध्ये नोंद असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची मागणी रेटून धरली. पोलिसांनी पारदर्शक चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी रामसिंह चव्हाण यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची तयारी दर्शविली.
सहायक पोलीस उपनिरीक्षक रामसिंह चव्हाण यांनी सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत तत्कालीन पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण व हेड मोहरीर यांचा उल्लेख आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींमध्ये केला होता.
नातेवाइकांनी मंगळवारी पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांची भेट घेऊन रामसिंह चव्हाण यांनी अनुभवलेल्या मानसिक ताणाची जाणीव करून दिली. पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचे कशाप्रकारे मानसिक खच्चीकरण केले, याबाबत सर्व इत्थंभूत माहिती रामसिंह यांच्या नातेवाइकांनी डीसीपी सोळंके यांना दिली. यावेळी रामसिंह यांच्या पत्नी अनिता, त्यांचा मुलगा सागर, अमन व अन्य नातेवाईक उपस्थित होते. कायद्याच्या चाकोरीत राहून संपूर्ण तथ्ये तपासली जातील. त्यानंतर जे दोषी असतील, त्यांच्याविरुद्ध कारवाई करू असे लेखी आश्वासन आसाराम चोरमले यांनी चव्हाण कुटुंबीयांना दिले आहे.