Saturday, June 3, 2023

लहान भावाच्या आत्महत्येनंतर मोठ्या भावानेही संपवले जीवन; दोन कर्ते गमावल्याने कुटुंब संकटात

औरंगाबाद | लहान भावाने आत्महत्या करून दीड महिना उलटला नाही तोपर्यंतच मोठ्या भावाने विष भाषण करून आत्महत्या केल्याची घटना फुलंब्री तालुक्यातील शेलगाव खुर्द येथे रविवारी घडली. प्रभाकर त्र्यंबक विधाटे (वय 45) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

कर्जबाजारी व नापिकीमुळे या दोन सख्ख्या भावांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. शेलगाव खुर्द येथील प्रभाकर इधाटे यांच्यावर खासगी सावकार तसेच बँकांचे कर्ज होते. सततच्या नापिकीमुळे कर्ज फेडणे अशक्य झाले होते. याच बाबीला कंटाळून त्यांचा लहान भाऊ भास्कर यानेही दीड महिन्यापूर्वी आत्महत्या केली होती. भावाच्या जाण्याने प्रभाकर इधाटे हेही खचले होते. यात दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने ऊस कसा येणार आणि कर्ज कसे फेडावे या सततच्या विचाराने रविवारी विष प्राशन करून त्यांनी आत्महत्या केली.

कुटूंबियांना विष प्राशन केल्याचे कळताच त्यांनी तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई-वडील पत्नी दोन मुली असा परिवार आहे. एकाच घरातील दोन कर्ते व्यक्ती गमावल्याने कुटुंबावर संकट आले आहे. या घटनेबाबत गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.