औरंगाबाद | संपूर्ण राज्यभर कोरोना महामारीचा प्रभाव दिसत आहे. त्यातच आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची चाहूल लागत आहे. प्रशासनाकडून दुसऱ्या लाटेतील त्रुटी ओळखून तिसऱ्या लाटेची तयारी सुरू केली आहे. या तिसर्या लाटेत बालकांना धोका असल्यामुळे त्यादृष्टीने प्रशासनाने आयसीयु, व्हेंटिलेटर, 631 बेड, 45 व्हेंटिलेटर बालकांसाठी उपलब्ध केले आहेत. त्याचबरोबर 28 व्हेंटिलेटर सीएसआर निधीतून उपलब्ध करण्यात आले आहेत. कोरोनाच्या तिसर्या लाटेत तीनशे डॉक्टरांना लहान बाळांना हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय कोरोनाची आढावा बैठक पार पडली. यावेळेस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपाचे अतिरिक्त आयुक्त बीबी नेमाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर कानन येळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुंदर कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे, संगीता सानप, रिता मैत्रेवार, संगिता चव्हाण, मंदार वैद्य, मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडेलचा, डॉक्टर नीता पाडळकर, पर्यटन विभागाचे उपसंचालक श्रीमंत हारकर, डॉ. लड्डा, डॉ. विजयकुमार वाघ, अजोय चौधरी हे उपस्थित होते.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा मृत्यू होणार नाही यासाठी प्रयत्न करावेत, आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांबाबत आरोग्य यंत्रणा यांनी कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आरोग्य विभागाने पॉझिटिव्ह असलेल्या कोरोनाच्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घ्यावा. नागरिकांच्या चाचण्या करण्यावर अधिक भर देऊन रिक्षाचालक, भाजीविक्रेते, दूध विक्रेते, दुकानदार या सुपर स्प्लेंडर असणाऱ्या व्यक्तींची चाचणी करावी तसेच आवश्यक औषध उपलब्ध आहे की नाही याबाबत खात्री करावी. जिल्ह्यात 24 ठिकाणी ऑक्सीजन प्लांट उभारण्यात येत असून त्यापैकी चार प्लांट उभारले आहेत. उर्वरित प्लांट लवकरात लवकर उभारण्यात यावे असे निर्देश चव्हाण यांनी दिले आहे.