कोरोनाग्रस्त वृद्धाची मिरजेतील रुग्णालयात चाकूने गळा कापून आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

मिरज येथील शासकीय कोव्हिड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या वृद्धाने चाकूने स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केली. हा प्रकार आज पहाटे घडला. ५८ वर्षीय हुसेन बाबुमिया मोमिन असे मृत वृद्धाचे नाव आहे. दरम्यान, मृताच्या नातेवाईकांनी मात्र याबाबत संशय व्यक्त केला असून, घाईगडबडीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करू नयेत, अशी भूमिका घेतली आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज मिळावे, असा आग्रह नातेवाईकांनी धरला आहे.

मिरजेतील शासकीय कोव्हिड रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, हुसेन बाबूमिया मोमिन यांना करोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना दहा दिवसांपूर्वी उपचारासाठी शासकीय कोव्हिड रुग्णालयात दाखल केले होते. सोमवारी पहाटेच्या सुमारास आरोग्य कर्मचा-यांना मोमिन यांच्या बेडवर रक्त दिसले. जवळ जाऊन तपासणी केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पहाटे तीनच्या सुमारास आरोग्य कर्मचाऱ्यांनी मोमिन यांचा मुलगा मुस्तफा याला मोबाइलवरून घटनेची माहिती दिली. तसेच पोलिसांनाही कळवले. घटनेची माहिती मिळताच मिरज पोलिसांनी रुग्णालयात जाऊन पाहणी केली असता, हुसेन मोमिन यांच्या गळ्यावर जखम असल्याचे दिसले. त्याचबरोबर बाजूला चाकू पडला होता. मोमिन यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. यानुसार रुग्णालय प्रशासनाने मृताच्या नातेवाईकांना माहिती दिली. दरम्यान, मृत हुसेन मोमिन यांचा मुलगा मुस्तफा याने वडिलांच्या आत्महत्येबद्दल संशय व्यक्त केला आहे.

‘आत्महत्या करण्यासारखी वडिलांची मानसिक स्थिती नव्हती. रुग्णालय प्रशासनाने करोना वार्डातील सीसीटीव्ही फुटेज द्यावे. पोलिसांनी योग्य चौकशी करावी, त्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार करू नयेत,’ अशी भूमिका मोमिन यांचा मुलगा मुस्तफा मोमिन याने घेतली आहे. करोनाबाधित रुग्णाने शासकीय रुग्णालयात आत्महत्या केल्याचे वृत्त पसरताच सांगलीत खळबळ उडाली आहे. या घटनेची महात्मा गांधी पोलीस चौकीत नोंद झाली असून या बाबतचा अधिक तपास आता पोलीस करत आहेत.

Leave a Comment