वाई | तालुक्यातील सुरूरच्या स्मशानभूमीत अल्पवयीन मुलीची अंधश्रद्धेतून अघोरी पूजा केल्याप्रकरणी पोलिसांनी 6 संशयितांना अटक केली असल्याची माहिती भूईज पोलिसांनी दिली. राहूल राजेंद्र भोसले (वय- 26), नितिन लक्ष्मण चांदणे (वय- 39), विशाल बाबासाहेब चोळसे (वय- 32), सुमन बाळासाहेब चोळसे (वय- 50), सुशिला नितिन चोळसे (वय- 35), केसर लक्ष्मण चांदणे (वय- 55, सर्व रा बाबासाहेब आंबेडकर कमानीसमोर रामटेकडी हडपसर पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. वाई न्यायालयात सहाजणांना हजर केले असता त्यांना 30 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
एक व्हिडीअो व्हायरल झाल्याने सुरूर येथील स्मशानभूमीत मांत्रिकाने एका अल्पवयीन युवतीवर अघोरी पूजा केली होती, हे समोर आले. स्मशानभूमीत हळदी-कुंकवाचे गोलाकार रिंगण आखून त्याशेजारी अंडे, नारळ, लिंबू, काळी बाहुली ठेवली. अल्पवयीन मुलीस केस मोकळे सोडून बसवत पुजा केली होती. तिच्या हातात कोंबडाही देण्यात आला होता. ही बाब युवक व ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी या प्रकाराला अटकाव केला होता. त्यानंतर संबंधितांनी पळ काढला होता. याप्रकरणी विवेक चव्हाण याने तक्रार दिली होती.
या घटनेची जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी दखल घेत भुईंज पोलिस स्टेशनचे सपोनि आशिष कांबळे व त्यांच्या टीमला तपासाबाबतच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पीएसआय निवास मोरे, हजेरी मेजर तुकाराम पवार, प्रशांत शिंदे, रविराज वर्णेकर, प्रसाद दुदुस्कर आदींचे पथक हडपसर पुणे येथे गेले. भुईंज पोलिसांनी सोमवारी रात्री संबंधित महिला व पुरुषांसोबत त्या मुलीलाही ताब्यात घेतले होते. संबंधित मुलीची चाईल्ड वेलफेअर कमिटीच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथील बालसुधार गृहात रवानगी केली तर उर्वरित संशयितांना अटक केली.