औरंगाबाद – नारेगावातील फर्निचरच्या दुकानाला काल सायंकाळी लागलेल्या आगीने भीषण रूप घेत अन्य तीन दुकाने जळून राख झाली. अग्निशामन दलाच्या तीन गाड्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्याने अखेर आग आटोक्यात आली. या आगीत पत्राचा शेड मधील छोट्या उद्योगांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
नारेगाव परिसरात सोफे व सुटकेस बॅग तयार करणारे दुकान, चिवडा तयार करणारी सानी फुड्स नमकीन कंपनी, बेसन तयार करणारे राज फ्लोअर मिल या तीन दुकानांना सायंकाळी 6:15 च्या सुमारास आग लागली. आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती कोणी देऊ शकले नाही. परंतु आगीत फरसान च्या दुकानातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग अधिकच भडकली. आगीच्या ज्वाला उंच उंच उठत होत्या. आगीचा लोळ आणि अवघा परिसर प्रकाशमान झाला होता. त्यानंतर अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी दोन ते अडीच तास शर्तीचे परिश्रम घेऊन आग आटोक्यात आणली. परंतु तोपर्यंत दुकाने आगीत भस्मसात झाली होती.
आगीची माहिती मिळताच उपनिरीक्षक अबुज कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचल्या. आग कशामुळे लागली हे समोर आले नाही. नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असले तरी व्यवसायिकांनी नुकसानीचा आकडा मात्र सांगितलेला नाही. तो आल्यावर सांगता येईल असे पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी सांगितले. सुदैवाने आग शेजारच्या वसाहतीकडे पसरली नसल्याने मोठा अनर्थ टळला.