नगरमधील हात अखेर कमळाकड़े गेलाच..!!

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

डॉ सुजय विखे लागले भाजपच्या गळाला, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केला भाजपमध्ये प्रवेश

अहमदनगर प्रतिनिधी | मागील अनेक दिवसांपासून नगरच्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून चर्चेत असलेले सुजय विखे पाटील आज भाजपवासी झाले. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव असलेले सुजय अहमदनगरची लोकसभा जागा लढवू इच्छित होते. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतून त्याबाबत सकारात्मकता न दिसल्याने त्यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. मुंबईत आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

दरम्यान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णा शेलार आणि नगरपरिषदेतील पाच नगरसेवक सुजय यांच्या गटाचे असल्याने त्यांची आगामी निवडणुकीत काय भूमिका राहणार याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर पहिली मोठी राजकीय खेळी करण्यात भाजप यशस्वी झाला आहे. भाजप एकीकडे माणसं जोडत असताना स्वतःकडे असलेली हक्काची माणसं काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवाले हरवत चालली असल्याचं एकूण चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळत आहे.

अहमदनगरच्या लोकसभा जागेसाठी राधाकृष्ण विखेंनी पुत्रप्रेमापोटी दिल्लीपर्यंत प्रयत्न केला. राज्यातील नेत्यापासून ते दिल्लीतल्या हायकमांड बैठकीतसुद्धा त्यांना योग्य ते आश्वासन दिल गेलं नाही. दरम्यान राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी विखे – पवार संघर्ष अजून या महाराष्ट्रात आहे, याचे सुतोवाच या घटनेतून दिले होते. अहमदनगरच्या जागेवर पवार माघार घेण्यास तयार नव्हते. राधाकृष्ण विखेंनी शरद पवारांना अनेक वेळा विनवण्यासुद्धा केल्या परंतु त्यांच्या पदरी निराशा पडली. मुलाच्या भाजप प्रवेशानंतर नाराज झालेले राधाकृष्ण विखे पाटीलसुद्धा पुत्रप्रेमापोटी भाजपामध्ये जाणार का ?अशी चर्चा सध्या सर्वत्र रंगत आहे. राज्यात एकीकडे शरद पवार यांनी नातवाच्या हट्टापायी माढ्यातुन माघार घेतली असल्याची चर्चा असताना राधाकृष्ण विखे पाटलांनीही स्वार्थ पाहत मुलगा भाजपच्या हवाली केला आहे. त्यामुळे मुलांचे बालहट्ट पुरवताना महाराष्ट्राचं राजकारण कोणतं वळण घेणार याच उत्तर येणाऱ्या निवडणुकाच देतील.