टीम हॅलो महाराष्ट्र । अहमदाबाद पोलिसांनी नोव्हेंबर महिन्यात नंबर प्लेट नसल्याने पोर्शे ९११ कार जप्त केली होती. त्यानंतर बरोबर दोन महिन्यानंतर कारचे मालक रणजीत देसाई यांनी अहमदाबाद प्रादेशिक परिवहन कार्यालयात नियमाप्रमाणे दंडाची रक्कम भरल्यानंतर आपली कार पोलिसांकडून मिळवली. मात्र, यासाठी देसाई यांना दंडाच्या रूपात मोठी रक्कम चुकवावी लागली. दंड म्ह्णून भरलेली ही रक्कम २७.६८ लाखांच्या घरात होती. या दंडाच्या रकमेमध्ये थकीत कर आणि त्यावरील व्याजाचाही समावेश आहे. याबाबत माहिती देणारा पावतीचा फोटो आता अहमदाबाद वाहतूक पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.
याबाबतच्या सविस्तर माहितीनुसार ”देशात पहिल्यांदाच इतका मोठा दंड वसूल करण्यात आल्याचा पोलिसांकडून दावा करण्यात आला आहे. यासाठी आरटीओने २७.६८ लाखांचा दंड ठोठावला. देशात आतापर्यंत ठोठावण्यात आलेली दंडाची ही सर्वात मोठी रक्कम आहे,” असं पोलिसांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे. हेलमेट क्रॉसरोड येथे २८ नोव्हेंबर रोजी नंबर प्लेट नसल्याने पोलिसांनी कार जप्त केली.
चालकाकडे चौकशी केली असता योग्य कागदपत्रं सादर करु न शकल्याने कार जप्त करण्यात आली होती अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. “यामुळे आम्ही कार जप्त करत मोटार वाहन कायद्यांतर्गत आरटीओ मेमो जारी केला होता. याचा अर्थ चालकाने आरटीओकडे दंडाची रक्कम जमा करावी आणि कार परत मिळवण्यासाठी पावती घेऊन हजर राहावं,” असं पोलिसांनी सांगितलं आहे. सुरुवातीला चालकाला ९.८ लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. पण जेव्हा कारमालक दंडाची रक्कम भरण्यासाठी पोहोचले तेव्हा आरटीओने जुना रेकॉर्ड पाहिला आणि दंडाची रक्कम २७.६८ लाखांपर्यंत पोहोचली.
— Ahmedabad Police (@AhmedabadPolice) January 8, 2020