अहमदनगर जिल्ह्यात विधानसभेला प्रस्थापितांच्या राजकारणाला धक्का बसणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा म्हणजे नगर (Ahmednagar) … राजकारणाचाच विचार करायचा झाला तर याच नगरचं राजकारण भल्याभल्यांना पाणी पाजणारं…. विखे, थोरात, गडाख, पाचपुते यांसारखी दिग्गज राजकारणी याच जिल्ह्यातील… या जिल्ह्यानं राजकारणातील अनेक बदल पाहिले आणि विखेंसारख्या प्रस्थापितांचा लंकेसारख्या सर्वसामान्य नेत्याने लोकसभेला केलेला पराभवही… त्यामुळे नगरमध्ये राजकारणात बदलाचे वारे वाहत असताना जिल्ह्यातील तब्बल 12 विधानसभा मतदारसंघात निकाल कोणाच्या बाजूने लागतोय? शिर्डी पासून ते कर्जत जामखेड पर्यंत नगरचे संभाव्य बारा आमदार कोण असतील? विधानसभा निवडणुकीला जिल्ह्यातील वारं कुणाच्या दिशेने वाहतंय? महाविकास आघाडी की महायुती? त्याचंच केलेलं हे पॉलिटिकल डिकोडिंग…

यातला पहिला मतदारसंघ पाहुयात तो संगमनेरचा…काँग्रेसचे पहिल्या फळीतील नेते बाळासाहेब थोरात यांचा हा बालेकिल्ला… संगमनेरवर त्यांची पकड अशी की आत्तापर्यंत सात वेळा ते याच मतदारसंघातून विधानसभेचे प्रतिनिधित्व करतायत… त्यांच्या विरोधात प्रत्येक टर्मला शिवसेना लढत देत असते पण विजय होतो तो थोरातांचाच…कारखाना, शिक्षण संस्था, हॉस्पिटल्स आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवरील एक हाती होल्डमुळे यंदाही महायुतीकडून इच्छुकांची भाऊ गर्दी असली तरी थोरातच आरामात निवडून येतील…दुसरा मतदारसंघ आहे शिर्डी …… संगमनेर थोरातांचा तसा शिर्डी विखेंचा बालेकिल्ला…1995 पासून पक्ष बदलले पण राधाकृष्ण विखेच इथले परमनंट आमदार राहिले… शिर्डीत विखेंना विरोधक नसणं हेच त्यांच्या राजकारणाला नेहमी पोषक राहीलं… ग्रामपंचायतींपासून ते सहकारी संस्थांपर्यंत ‘सब कुछ विखे’ असा शिर्डीत पॅटर्न पाहायला मिळतो…पण लोकसभेतील पराभवानं विखेंच्या प्रस्थापित राजकारणाला सुरुंग बसला… आणि त्याचाच इम्पॅक्ट शिर्डीतही पाहायला मिळू शकतो…मात्र सध्या तरी महाविकास आघाडीकडे प्रबळ दावेदार नसल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांची आमदारकी सेफ झोन मध्ये आहे…

YouTube video player

तिसरा मतदारसंघ आहे कर्जत जामखेडचा….. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पवार इथले विद्यमान आमदार… खरं म्हणजे 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या राम शिंदे यांचा पराभव करत रोहित पवार जायंट किलर ठरले. शिंदेंनी आपल्या या पराभवाचं खापर विखे पिता पुत्रांवर फोडलं होतं. पण आता विधानसभेला पुन्हा एकदा रोहित पवार आणि राम शिंदे एकमेकांच्या विरोधात आमने-सामने पाहायला मिळतील… पण अजित पवार गटाने या मतदारसंघावर दावा केल्याने तिकीट वाटपात महायुतीत मोठा संघर्ष पाहायला मिळू शकतो. अजितदादा गटातील जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मंजुषा गुंड आणि त्यांचे पती राजेंद्र गुंड हे देखील विधानसभेसाठी इच्छुक आहेत… त्यासोबत भाजपकडून प्रवीण घुले देखील उमेदवारीसाठी अडून बसल्याचं समजतंय… पण मागील पाच वर्षांत रोहित पवारांनी कर्जत जामखेड मध्ये केलेली विकास कामं आणि पक्षबांधणी बघता याही टर्मला त्यांच्याच विजयाचे चान्सेस जास्त आहेत…

चौथा मतदारसंघ आहे तो शेवगाव पाथर्डीचा…भाजपच्या विद्यमान आमदार मोनिकाताई रांजळे या सलग दोन टर्म शेवगाव पाथर्डीची आमदारकी राखून आहेत… वंजारी समाजाची या मतदारसंघात मोठी ताकद आहे… म्हणूनच की काय आता पंकजाताई मुंडे यांच्या पराभवानंतर प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा या मतदारसंघासाठी होतेय. मुंडे यांचे कार्यकर्तेही प्रीतम मुंडे यांना या मतदारसंघातून निवडणुकीसाठी गळ घालतायत… मोनिका रांजळे यांच्या डोक्यावर मुंडे कुटुंबाचा हात असल्यानं त्या इथून दोन टर्म सहज निवडून आल्या. पण त्या मुंडे कुटुंबातील उमेदवारासाठी जागा खाली करतील का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यात विधानसभेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रताप ढाकणे हेच पुन्हा तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असून खासदार निलेश लंके यांनी ढाकणेंना आमदार बनवण्याचा शब्द देऊनआमदार बनवण्याचा शब्द देऊन शेवगावच्या राजकारणात नवा ट्विस्ट आणलाय…पाचवा मतदारसंघ येतो तो राहुरीचा…तसं पाहायला गेलं तर भाजपच्या शिवाजीराव कर्डिले यांचा हा बालेकिल्ला… पण 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या प्राजक्त तनपुरे हे जायंट किलर ठरत त्यांनी कर्डिलेंच्या राजकीय घोडदौडीला ब्रेक लावला…नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही प्राजक्त तनपुरे यांनी निलेश लंकेच्या पाठीशी आपली सारी यंत्रणा लावली होती… त्याचाच इम्पॅक्ट म्हणून लंके आज खासदार आहेत…त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला राहुरीतून पुन्हा एकदा कर्डिले विरुद्ध तनपुरे अशी लढत होणार असून यंदा ‘राहुरीत फक्त आपणच!’ हे कोण सिद्ध करून दाखवणार? ते पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे…

सहावा मतदारसंघ आहे तो श्रीगोंदा…भाजपचे दिग्गज बबनराव पाचपुते हे श्रीगोंद्याचे विद्यमान आमदार. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून माजी आमदार राहुल जगताप यांच्याच नावाची पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे. यासोबत अनुराधा नागवडे, शिवसेना उपनेते साजन पाचपुते, अण्णासाहेब शेलार, घनश्याम शेलार यांनीही उमेदवारीसाठी दंड थोपटल्याने श्रीगोंद्याचे चित्र सध्यातरी अस्पष्टच म्हणावं लागेल.. पण लोकसभेला महाविकास आघाडीच्या बाजूने लागलेला रिझल्ट पाहता श्रीगोंद्यातही त्याचा इम्पॅक्ट पाहायला मिळेल असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे…सातवा मतदारसंघ येतो तो कोपरगावचा सहकाराचा बालेकिल्ला समजला जाणारा कोपरगाव विधानसभा मतदारसंघ… कोपरगाव मतदार संघात सत्तेसाठी काळे आणि कोल्हे या दोन परिवारातील संघर्ष संपूर्ण राज्याने पाहिलाय… या मतदार संघात काळे आणि कोल्हे यांच्यातली लढत परंपरागत असते. कधी कोल्हे तर कधी काळेंकडे सत्ता… मावळत्या विधानसभेलाही भाजपकडून स्नेहलता कोल्हे तर राष्ट्रवादीकडून आशुतोष काळे यांच्यात लढत झाली पण बाजी मारली ती काळे यांनी…पण राष्ट्रवादीच्या फुटीत काळे अजितदादांसोबत आल्यानं काळे आणि कोल्हे हे दोघेही परस्पर कट्टर विरोधक आता एकाच महायुतीचे भाग झालेत… पण विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनाच तिकीट मिळण्याचे चान्सेस जास्त असल्यानं कोल्हे शरद पवारांची तुतारी हातात घेतील का? यावर इथल्या निकालाचं गणित ठरणार आहे…

आठवा मतदारसंघ येतो तो अहमदनगर शहर विधानसभेचा….. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संग्राम जगताप इथले विद्यमान आमदार. नगर शहर हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला… पण 2014 पासून सलग दोन टर्म शिवसेनेच्या अनिल राठोडांना असमान दाखवत संग्राम जगताप आमदार झाले… राष्ट्रवादी फुटीत त्यांनी अजितदादांना साथ दिल्यानं महायुतीकडून त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याचे सर्वाधिक चान्सेस आहेत… मात्र अनिल राठोड यांच्या निधनानंतर जगतापांना कडवं आव्हान देईल, असा प्रतिस्पर्धी सध्या तरी मतदारसंघात दिसत नाहीये. मात्र महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे किरण काळे, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिषेक कळमकर आणि शिवसेना ठाकरे गटाचे माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी संग्राम जगताप यांना आव्हान देण्यासाठी तयारी दाखवली आहे… मात्र सध्यातरी अहमदनगर शहरमध्ये संग्राम जगताप यांचंच पारडं जड दिसतय…नववा मतदारसंघ आहे पारनेरचा…आमदारकीला शिवसेनेचे विजय औटी तर खासदारकीला सुजय विखेंचा पराभव करत नगरच्या राजकारणात निलेश लंके नावाचा ब्रँड तयार झालाय… पण त्यांची पाळमूळ रुजली ती याच पारनेर मतदारसंघात… निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांच्या नावाची पारनेरसाठी चर्चा होतेय… पण महाविकास आघाडीकडून कोण हे अद्याप क्लियर नाहीये. बाकी काहीही झालं तरी निलेश लंकेचा अप्पर हँड असल्यामुळे पारनेरमध्ये आघाडीचाच उमेदवार सरशी मारेल, अशी चर्चा आहे…

दहावा मतदार संघ येतो तो अकोले विधानसभा…आदिवासी बहुल असणाऱ्या या मतदारसंघात सध्या किरण लहामटे हे विद्यमान आमदार आहेत… भाजपच्या वैभव पिचड यांना मात देत ते 2019 ला गेम चेंजर ठरले… पण पुढे ते अजितदादा गटात आल्यानं लहामटे आणि पिचड दोघेही महायुतीचे भाग बनलेत…महायुतीकडून उमेदवारीचा शब्द मिळाल्यामुळेच लहामटे यांनी आधी घड्याळ मग तुतारी आणि पुन्हा घड्याळ अशी भूमिका बदलली… पण जर लहामटे यांना शब्द दिला गेला असेल तर वैभव पिचड पुन्हा शरद पवारांकडे परतणार का? यावर इथला निकाल कसा लागेल ते ठरणार आहे…अकरावा मतदारसंघ आहे श्रीरामपूरचा…काँग्रेसचे लहू कानडे इथले विद्यमान आमदार. श्रीरामपूर तालुका हा ऊस आणि कांदा उत्पादकांचा तालुका…जितके नेते तितके गट असले तरीही श्रीरामपुरात विखेंच्या हातात आमदारकीची चावी असते, असं बोललं जातं… यंदाही आघाडीकडून लहू कानडे यांच्याच नावाची चर्चा असताना विरोधात कोण याचा अंदाज अजूनही मतदारसंघाला लागलेला नाही…

आता पाहूयात शेवटचा आणि बारावा मतदारसंघ तो म्हणजे नेवासा विधानसभा… नेवासा ही संत ज्ञानेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी… भाजपच्या बाळासाहेब मुरकुटेंनी राष्ट्रवादीच्या शंकरराव गडाख यांचा मोदी लाटेत पराभव केला… त्याचाच वचपा गडाखांनी 2019 मध्ये काढला… अपक्ष म्हणून ते आमदार झाले… पण यानंतर ठाकरे गटाने नेवासातील त्यांची ताकद लक्षात घेत गडाखांना आघाडीच्या सरकारमध्ये मंत्रीपद दिलं… त्यामुळे शंकरराव गडाख यंदा मशाल या चिन्हावर त्यांच्या विरोधात बाळासाहेब मुरकुटे महायुतीकडून मैदानात असतील, असं सध्या मतदार संघातील चित्र आहे. मात्र गडाखांची स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते सहकारापर्यंत असणारी पकड पाहता यंदा तेच पुन्हा नेवासाचे ठाकरे गटाचे आमदार असतील, असं बोललं जातंय…तर असं आहे सध्याचं अहमदनगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघांचं संभाव्य राजकीय गणित…. बाकी नगरच्या राजकारणात विधानसभेला कोणते राजकीय फॅक्टर महत्त्वाचे ठरतील? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा….