हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निलेश लंके पाठांतर करुन माझ्यासारखं फाडफाड इंग्रजी बोलले तर नगरमधून उमेदवारी मागे घेईन’ भाजपच्या तिकीटावर दक्षिण नगरमधून निवडणूक लढवणारे सुजय विखे पाटलांनी (Sujay Vikhe Patil) तुतारीच्या जोरावर लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या प्रतिस्पर्धी निलेश लंके यांना खुलं आव्हान दिलं. प्रश्न प्रतिष्ठेचा होता. लंकेंनीही जशास तसं उत्तर देत विखेंना घाम फोडला. “प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान असायला हवा. संसदेत खासदाराला आपल्या भाषेत बोलता येतं. तुम्ही कोणत्या भाषेत बोलता यापेक्षा तुम्ही शेतकऱ्यांची, सर्वसामान्य लोकांची किती बाजू लावून धरता हे जास्त महत्वाचंं आहे. या सगळ्यावरुन एक आपल्या पक्कं लक्षात आलं असेल की यंदा नगरच्या राजकारणाला बरीच गरमागरमी आहे. राजकारणातील प्रस्थापित समजल्या जाणाऱ्या विखे पाटलांचे सुपुत्र सुजय विखे यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करत २०१९ चं खासदाकीचंं मैदान मारलं. भाजपतील अनेक स्थानिक नेते विरोधात असतानाही त्यांनी सलग दुसऱ्यांदा तिकीट मिळवलंच. पण त्यांच्या विरोधात मविआकडे तोडीस तोड हुकुमी एक्का नव्हता. अशातच फ्रंटला आले ते शरद पवार. अजित पवार गटातील लोकसभेसाठी इच्छुक असणाऱ्या निलेश लंके यांच्या हातात तुतारी देत त्यांनी नगरचं भाजपचं गणित अवघड करुन टाकलं. प्रस्थापित विरुद्ध सर्वसामान्य नेतृत्व अशी ही दोन विरुद्ध टोकांची लढाई असल्यानं नगरचं मैदान मारणं दोन्ही पक्षांसाठी महत्वाचं आहे. नगर लोकसभा मतदारसंघाचा हाच लेखाजोगा जाणून घेणार आहोत
2019 मध्ये अहमदनगर दक्षिणच्या (Ahmednagar South) जागेवर मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. अनेकांनी पक्ष बदलले.. निष्ठा बदलली… आणि त्याचा परिणाम म्हणून नवीन नेतृत्व तयार होऊन 2024 उजाडता उजाडता या जागेचा गुंता आणखीनच वाढत गेला. नगर दक्षिण म्हटलं की मुख्य लढत असते ती राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये. आमदारांचं संख्याबळ राष्ट्रवादीकडे जास्त असलं तरी या जागेवरून भाजपचाच उमेदवार निवडून येण्याची परंपरा कायम राहिलीय. 2004 ची तुकाराम गडाख यांची एक टर्म वगळली तर 1999 पासून 2019 पर्यंत सलग या जागेवर भाजपचे दिलीप गांधी निवडून येत होते.
मात्र 2019 ची निवडणूक तोंडावर येण्याच्या आधीच अहमदनगरचा युती आणि आघाडीतील धुसफूस बाहेर आली. आघाडीमध्ये पवारांनी ही जागा काँग्रेसला काही केल्या सुटणार नाही. कारण मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या जास्त आहे. तसेच ज्या जागेवर आमदार नाहीत तिथे दोन नंबरची मत ही राष्ट्रवादीलाच आहेत. त्यामुळे ही जागा काँग्रेसला सोडण्याचा प्रश्नच येत नाही. अशी ठाम भूमिका घेतली. त्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेसमधील वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश करत तिकीट मिळवलं. या सगळ्याला शरद पवार आणि विखे पाटील यांच्यातील जुन्या वादाची किनार देखील असल्याचं बोललं जातं. विखे पाटलांनी पक्ष बदलताच राष्ट्रवादी कडून या जागेवर नगरचे आमदार संग्राम जगताप यांना तिकीट देण्यात आलं.
विखे पाटलांना काही केल्या धूळ चारायचीच हा पण केल्यामुळे म्हणा स्वतः पवार या मतदारसंघात तळ ठोकून होते. जगताप विरुद्ध विखे पाटील ही निवडणूक चांगलीच घासून होणार असं वाटत असताना सुजय विखेंनी मात्र तब्बल 2 लाख 81 हजार मतांनी जगतापांचा पराभव केला. या निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसचे स्टार प्रचारक होते. मात्र निवडणूक निकाल नंतर त्यांनी आपल्या मुलापाठोपाठ भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर विखे पाटील पितापुत्रांचं भाजपमध्येच नव्हे तर केंद्रातही वजन वाढू लागलं.
ही गोष्ट मात्र देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या राम शिंदे यांच्या पचनी पडली नाही. त्यातच विधानसभेतल्या निवडणुकीतील पराभवाला विखे पाटील हे आपल्याच पक्षातील नेते असल्याची तक्रारही त्यांनी पक्ष श्रेष्ठींकडे केली होती. यानंतर भाजपातील राम शिंदे वर्सेस विखे पाटीलहा वाद अनेकदा पाहायला मिळाला. विखे पाटलांना मतदारसंघात पक्षांतर्गत बराच विरोध असतानाही 2024 मध्ये त्यांचं तिकीट पुन्हा रिपीट करण्यात आलं… मविआकडे मात्र सुजय विखेंच्या प्रस्थापित राजकारणाला जड जाईल असा उमेदवार नव्हता. मात्र शरद पवारांच्या एका खेळीने हा गुंता सुटला… अजित पवार गटात असणारे निलेश लंके खासदारकीसाठी इच्छुक होते. मात्र महायुतीत ही जागा विखेंना सुटल्याने युतीधर्म म्हणून विखेंचा प्रचार करण्याची वेळ लंकेंवर आली. नगरच्या राजकारणात विखे आणि लंके यांचा तसा छत्तीसचा आकडा…शेवटी लंके यांच्या राजकीय महत्वकांक्षांना पंख फुटले. पहिल्याच टर्ममध्ये आमदार झालेल्या लंकेंनी बंड केलं. अजित दादांच्या घड्याळाची साथ सोडत तुतारी हाती घेत शरद पवार गटाकडून तिकीट मिळवलं. त्यामुळे नगरच्या राजकारणात यंदा विखे विरुद्ध लंके हा अटीतटीचा सामना पाहायला मिळणारय…
अहमदनगरमधील राजकीय समीकरणं पाहता थोरात, जगताप समर्थकांचा विरोध आणि लंकेंना असलेला पाठिंबा यामुळं यावेळी विखेंना चांगलीच कसरत करावी लागणार हे जवळपास स्पष्ट आहे. विखेंचे त्यांच्या पक्षातील आणि विरोधी पक्षातील सर्वच विरोधक या निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्यांच्या विरोधात असल्याची चर्चा आहे. या सगळ्यांनी लंकेंना ताकद पुरवली…तर या जागेवर लंके यांचा विजय सोपा होऊ शकतो. विखे पाटलांच्या प्रस्थापित राजकारणाला शरद पवारांनी कायम विरोध केल्याचं बोललं जातं. शरद पवारांचा विरोध असल्याने 2019 मध्ये ही जागा आपल्याला सुटेल याची विखे पाटलांना खात्री नव्हती. म्हणूनच त्यांनी भाजपची वाट धरली. आता पुन्हा एकदा निलेश लंके सारख्या सर्वसामान्य जनमानसातून येणार नेतृत्व पुढे करत पवारांनी विखे पाटलांच्या प्रस्थापित राजकारणाला नख लावण्यासाठी मोर्चे बांधणी केलीय. शरद पवारांविषयी सॉफ्ट कॉर्नर असणारा मतदार प्लस, निलेश लंके यांचा ग्राउंड कनेक्ट प्लस, विखेंनी दुखावलेली राजकारणी मंडळी असं गणित करून पाहिलं तर मैदान लंकेच्या बाजूने जास्त झुकलेलं दिसतं… विखे यांचा नगरच्या राजकारणावर तसा मोठा प्रभाव आहे. त्यात भाजपचा बॅक सपोर्ट असल्याने विखे पाटीलही सहजासहजी मैदान सोडणार नाहीत…
रियालिटी पाहायचं झालं तर, कोविड मध्ये केलेल्या कामामुळे आणि लोकांच्यात मिसळण्याच्या आपल्या स्टाईलमुळे निलेश लंके हे नाव महाराष्ट्राला परिचित झालं. 2019 मध्ये पहिल्यांदाच शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या लंकेंना पारनेर विधानसभेची उमेदवारी मिळाली अन् ते जिंकले सुद्धा… मात्र लोकसभेचे गणित इतकं सोपं नसतं. लंके यांचा प्रभाव पारनेर मध्ये असू शकतो. पण नगरमध्ये जिंकायचं असेल तर संपूर्ण मतदारसंघात पोहोच असणं, कार्यकर्त्यांचं नेटवर्क असणं जास्त महत्त्वाचं असतं. यात सुजय विखे पाटील थोडे उजवे ठरतात…त्यामुळे अनेक अर्थाने महत्त्वाच्या ठरलेल्या आणि बरंच राजकीय नाट्य बघायला मिळालेल्या नगरच्या राजकारणात निलेश लंकेंची तुतारी सुजय विखेंचा गेम करणार? की विखे पाटील आपल्या मुरलेल्या राजकारणाचा इंगा लंकेंना दाखवणार? हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे…