हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| एअरलाइन क्षेत्रामध्ये एअर इंडिया (Air India) कंपनीचे नाव उच्च स्थानावर आहे. परंतु आता याचं एअर इंडियाला आपल्या चुकीमुळे तब्बल तीस लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. नुकतीच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एअर इंडियावर कारवाई करत त्यांना एका 80 वर्षीय प्रवाशाच्या मृत्यूप्रकरणी 30 लाख रुपयांचा दंड भरण्यास सांगितला आहे. या सर्व प्रकरणामुळे एअर इंडियाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
डीजीसीएची मोठी कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडिया कडून एका 80 वर्षीय प्रवाशाला व्हीलचेअरची सेवा पुरवण्यात आली नव्हती. त्यामुळे या वृद्ध प्रवाशाला विमानातून टर्मिनलपर्यंत चालत जावे लागले. याचाच त्रास या प्रवाशाला होऊ लागला आणि त्याची प्रकृती बिघडली. यानंतर काही वेळातच या वृद्धाचा मृत्यू झाला. याप्रकरणी डीजीसीएने एअर इंडियाला नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये 30 लाख रुपयांचा दंड भरण्यात यावा असे आदेश एअर इंडियाला (Air India) देण्यात आले आहेत.
त्याचबरोबर, “इथून पुढे ज्या प्रवाशांना त्यांच्या प्रवासादरम्यान विमानात चढताना किंवा उतरताना मदतीची आवश्यकता असेल, त्यांच्यासाठी पुरेशा प्रमाणात व्हीलचेअर उपलब्ध करण्यात यावे” असे सांगितले आहे. मात्र दुसऱ्या बाजूला, “एअर इंडियाने चुकलेल्या कर्मचाऱ्यांविरुद्ध एअरलाइनने केलेल्या कारवाईची माहिती दिलेली नाही. तसेच भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी एअरलाइनने कोणत्याही सुधारात्मक कारवाईची माहिती दिली नाही” असे डीजीसीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.
दरम्यान, गेल्या 16 फेब्रुवारी रोजी या वृद्ध व्यक्तीच्या निधनाची घटना घडली होती. त्यावेळी एअर इंडियाकडून (Air India) या वृद्ध व्यक्तीच्या पत्नीला व्हीलचेअर देण्यात आली होती. तर या वृद्ध पुरुषाला थोडा वेळ थांबण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी वाट पाहण्याऐवजी पायीच टर्मिनलपर्यंत जाणे पसंत केले. यामुळे त्यांना त्रास होऊन त्यांचा मृत्यू झाला. अशी माहिती डीजीसीएला दिलेल्या उत्तरात एअर इंडियाने आपली बाजू मांडत दिली आहे.