बंडातात्या कराडकरांवर अजून एक गुन्हा दाखल होणार?

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके

ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्र घेतला आहे. दरम्यान आज सातारा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी बंडा तात्यांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी सातारा शहर पोलिसांत आल्या आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी दिली आहे.

बंडातात्या कराडकर यांनी राजकीय नेत्यांबद्दल साताऱ्यात आंदोलना दरम्यान आक्षेपार्ह वक्तव्य केले. यानंतर त्यांच्यासह 125 जणांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला. दरम्यान आज बंडातात्या कराडकरांना पोलिसांनी ताब्यातही घेतले. यानंतर त्यांच्याविरोधात आणखी तक्रारी दाखल करण्यासाठी सातारा येथील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिला पदाधिकारी गेल्या असून त्याच्याकडून तक्रारी दाखल केल्या जात आहेत.

बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाणे मध्ये विनापरवाना जमाव जमवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना या चौकशीसाठी सातारा पोलीस घेऊन आले आहेत. सध्या त्यांच्यावर साताऱ्यात एक गुन्हा दाखल झाला असून महिलांबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल साताऱ्यातील राष्ट्रवादी महिला त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी सातारा शहर पोलिसांत आल्या आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी दिली आहे.