परदेशात लस पाठवण्यापेक्षा आपल्याच नागरिकांना वापरली असती तर ही वेळ आली नसती ;अजितदादांचा केंद्रावर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सुरुवातीच्या काळात भारतात तयार होणारी कोरोनाची लस केंद्र सरकारने परदेशात न पाठवता आपल्याच नागरिकांसाठी वापरली असती तर आज कोरोना लसींची कमतरता जाणवली नसती, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. सुरुवातीला तयार झालेली लस दुसऱ्या देशात पाठवायची काहीही गरज नव्हती असे आपले स्पष्ट मत असल्याचं पवार म्हणाले आहेत. आज एक मे महाराष्ट्र दिनाच्या  निमित्ताने अजित पवार यांनी पुण्यामध्ये झेंडा वंदन केलं त्यावेळी ते बोलत होते.

अजित पवार यांनी महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती सुधारत असल्याचे सांगितले. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या किंचित कमी झाली आहे. तर मुंबईमध्ये नव्या रुग्णांपेक्षा डिस्चार्ज मिळणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.

केंद्र सरकारने परवानगी दिल्यास आम्ही फायझर, स्पुटनिक, मॉडर्ना या परदेशी कंपन्यांच्या लसीही विकत घेऊ शकतो. तसेच 12 कोटी लसींच्या खरेदीसाठी महाराष्ट्र सरकार सिरम किंवा भारत बायोटेकला एकरकमी पैसे देण्यासही तयार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

जुलै-ऑगस्टमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या दृष्टीने आपण काळजी घेत आहोत आणि तयारी करत आहोत असाही दावा त्यांनी केला. या अनुभवातून भारत सरकार आणि राज्य सरकार हे शिकले आहेत असेही पवार म्हणाले. अनेक ठिकाणी आता ऑक्सिजन प्लांटस उभे राहत आहेत. जेणेकरून कोरोनाची तिसरी लाट आली तरी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवणार नाही, असे अजित पवार यांनी म्हटले.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

You might also like