हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा काही लपून राहिलेली नाही. अजितदादांनी सुद्धा अनेकदा जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. फक्त अजित पवारच नव्हे तर त्यांच्या समर्थकांची सुद्धा इच्छा आहे कि एक ना एक दिवस दादा मुख्यमंत्री व्हावेत… त्यामुळेच अजित दादांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवडमधील समर्थकांनी एक अनोखा केक आणलाय ज्यावर लिहिलं आहे कि मी अजित अनंतराव पवार, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की… अजित पवारांच्या या केकची चर्चा पुणे शहरात चांगलीच रंगली आहे.
उद्या म्हणजेच २२ जुलैला अजित पवारांचा वाढदिवस आहे. त्यापार्श्वभूमीवर अजितदादाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. त्यातच आगामी विधानसभा निवडणूक सुद्धा अवघ्या ३ महिन्यावर आली असून अजित पवारांना आता तरी मुख्यमंत्रीपद मिळावं अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा अनोखा केक तयार करण्यात आलाय. हा केक कापून अजित पवार यांनी वाढदिवसाच्या एका दिवस अगोदरच कापला. केक कापल्यानंतर अजित पवारांनी केक खाल्ला. यावेळी केकवरील मजकूर वाचून अजितदादांच्या चेहऱ्यावरील उमटलेले स्मित हास्य देखील लपून राहिले नाही.
अजित पवार पिंपरी चिंचवड दौऱ्यावर –
पिंपरी चिंचवड मध्ये शरद पवारांनी अजित पवार गटाचे अनेक माजी नगरसेवक आणि नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश देत बालेकिल्ल्यातच दादांना धक्का दिला. यामध्ये शहराध्यक्ष अजित गव्हाणें यांचाही समावेश असल्याने दादा गट बॅकफूटवर गेलाय. या पडझडीनंतर अजित पवार सुद्धा सक्रिय झालेत. आज अजितदादा पवार पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असून माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्याशी ते व्यक्तिगत संवाद साधणार आहेत. तसेच बैठका आणि मेळावा सुद्धा घेण्याची शक्यता आहे. शरद पवारांनी आपली आणखी काही माणसे गळाला लावू नयेत म्हणून अजित पवार आता ऍक्शन मोड मध्ये आलेत.