हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष्य आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाच्या चर्चा आहेत. खास करून महायुती मध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरून वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. आमचा स्ट्राईक रेट जास्त असल्याने आम्हाला जास्त जागा मिळतील असं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हंटल होते, त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनीही जागावाटपावरून मोठं विधान केलं आहे. महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस 80 ते 90 जागा लढेल असं पटेल यांनी म्हंटल आहे.
आज गोंदिया येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रफुल पटेल म्हणाले, जुन्या राष्ट्रवादी पक्षाकडून आमच्याकडे एकूण 57 आमदार होते. ही गोष्ट लक्षात घेता आम्ही विधानसभेत 85 ते 90 जागा मागणार आहोत असं पटेल यांनी सांगितलं. विशेष म्हणजे यापूर्वी छगन भुजबळ आणि अनिल पाटील यांनीही जवळपास इतक्याच जागांची मागणी केली होती. शिवसेनेला जेवढ्या जागा दिल्या जातील, तेवढ्याच जागा राष्ट्रवादीला द्याव्यात, असेही भुजबळ यांनी म्हटले होते. त्यामुळे जागावाटपाच्या मुद्द्यावरून महायुती मध्ये तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. खास करून शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळतेय.
मंत्रिपद मलाच मिळणार – प्रफुल्ल पटेल
दरम्यान, मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला स्थान मिळालेलं नाही. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात मंत्रिपदावरून वाद आहेत अशाही बातम्या प्रसारीत झाल्या होत्या. मात्र राज्यमंत्रीपद वाट्याला आल्याने ते नाकारण्यात आल्याचं नंतर सांगण्यात आलं. त्यातच आता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याना राज्यसभेवर खासदार केल्याने त्यांची वर्णी मोदींच्या मंत्रिमंडळात लागणार का अशा चर्चा सध्या सुरु आहेत. मात्र राष्ट्रवादीच्या कोट्यात जर कॅबिनेट मंत्री आलं तर ते मलाच मिळणार आहे, योग्य वेळ आल्यावर योग्य निर्णय होईल, असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं