हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ajit Pawar । राष्टवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अचानकपणे नोट रिचेबल झाले आहेत. पुण्यातील बारामती हॉस्टेलमधून अजित पवार कोणालाही काहीही न सांगता, कोणताही सरकारी ताफा किंवा पोलीस संरक्षण न घेता अचानक रवाना झाले आहेत. त्यामुळे अजित पवार नेमकं कुठे गेले? यावरून आता चर्चा सुरु आहेत.
नेमकं काय झालं – Ajit Pawar
मागील काही दिवसांपासून अजित पवार पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये विविध नियोजित बैठकांसाठी मुक्कामाला होते. बारामती हॉस्टेमध्येच ते इच्छुकांच्या मुलाखती, बैठका, गाठीभेटी घेत आहेत. मात्र, अचानक कोणतीही पूर्वकल्पना न देता ते हॉस्टेलमधून बाहेर पडले. विशेष म्हणजे, त्यांच्यासोबत नेहमी असणारा पोलिसांचा फौजफाटा, पायलट कार आणि सुरक्षारक्षकांचा ताफा मात्र हॉस्टेल परिसरातच उभा राहिला. अजित पवार एकटेच निघून गेल्याने दादा (Ajit Pawar) नेमके गेले कुठे असा प्रश्न सर्वाना पडला आहे.
पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. दोन्ही राष्ट्रवादीत जागा वाटपाचं सूत्र देखील ठरलं होतं. मात्र शरद पवार गटाच्या उमेदवारांनी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी अशी अट अजित पवारांनी घातली आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीची चर्चा फिस्कटली. अजित पवारांची हि भूमिका शरद पवार गटाला मान्य नसल्याने शरद पवार गट आता पुणे महापालिका निवडणूक महाविकास आघाडीसोबत लढवेल असं बोललं जात आहे एकीकडे, शरद पवार गटाशी चर्चा फिसकटल्यानंतर अचानक अशाप्रकारे अजित पवार नॉट रिचेबल झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
यापूर्वीही अजित पवार अनेकदा नॉट रिचेबल झाले होते. राष्ट्रवादी एकसंघ असताना जेव्हा २०१९ मध्ये शरद पवारांना ईडीची नोटीस आली त्यावेळी अजित पवार नॉट रिचेबल झाले होते. नंतर ते मीडियासमोर आले, आणि आम्हाला जाणूनबुजून टार्गेट करण्यात येतेय असा आरोप त्यांनी केला होता.




