साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या नेत्याला खासदार करणार; अजितदादांचे विधान चर्चेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आपल्या स्पष्ट भाषणशैलीसाठी ओळखले जातात. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात अजित पवारांना महायुतीत अवघ्या ४ जागांवर समाधान मानावे लागल्याने राष्ट्रवादीच्या नाराजांची मनधरणी करावी लागत आहे. यापूर्वी परभणीचे हक्काची जागा महादेव जानकर यांच्यासाठी सोडल्यानंतर राष्ट्रवादीचे इच्छुक असलेल्या राजेश विटेकर यांना आमदारकीचा शब्द देऊन अजितदादांनी कार्यकर्त्यांचे समाधान केले होते. आता, साताऱ्यातूनही अजित पवार यांनी असेच एक आश्वासन दिले आहे. साताऱ्यातून नितीन पाटलांना (Nitin Patil) मी खासदार करेन नाहीतर पवारांची औलाद सांगणार नाही असं अजितदादानी म्हंटल आहे.

खरं तर महायुतीमध्ये साताऱ्याच्या जागेवरून (Satara Lok Sabha Election) तिढा पडला होता. हि जागा भाजपचे उदयनराजे लढवणार कि अजित पवार गटाकडून नितीन पाटील लढवणार अशा चर्चा मागील महिनाभर सुरु होत्या. मात्र महायुतीत हि जागा भाजपला सुटली आणि उदयनराजे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या प्रचारार्थ आज वाई येथे अजित पवारांची सभा पार पडली. या सभेतच अजित पवारांनी नितीन पाटील यांना खासदारकीचा शब्द दिला आहे. मात्र त्यासाठी त्यांनी एक मोठी अटही घातली आहे. साताऱ्यातील महायुतीच्या उमेदवाराला 1 लाखाच्या फरकाने निवडून द्या, मग नितिन काकाला खासदार करणार, नाही केले तर पवारांची औलाद सांगणार नाही असं आश्वासन अजित पवारांनी वाईच्या जनतेला दिले.

नितीन पाटलांना खासदार कसं करणार?

उदयनराजे भोसले हे जरी निवडणुकीच्या रिंगणात असले तरी ते सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांच्या खासदारकीची अजून ३ वर्षे बाकी आहेत. त्यामुळे उदयनराजे निवडून आल्यानंतर भाजपाची ही जागा खाली होणार आहे, त्या जागेवर राष्ट्रवादीला संधी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. हाच धागा पकडत अजित पवारांनी नितीन पाटील यांना खासदारकीचे आश्वासन दिले आहे. वास्तविक महायुतीत साताऱ्याची जागा भाजपला गेल्याने नितीन पाटलांच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर होता, ते महायुतीला मतदान करतील कि नाही अशीही शंका होती. त्यामुळे कार्यकर्त्यांची नाराजी ओळखून अजित पवारांनी नितीन पाटलांना खासदारीचा शब्द दिला असेल असं बोललं जातंय.